

पुणे : नॉन ब्रँडेड अन्नधान्य आणि खाद्यान्नावर पाच टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आकारण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ शनिवारी (दि. 16) देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमध्ये राज्यासह शहरातील अन्नधान्य व्यापारी सहभागी होणार असल्याने शहरातील अ़न्नधान्याची दुकाने बंद राहणार आहेत. राज्यातील अन्नधान्य व्यापार्यांची परिषद गुलटेकडी मार्केट यार्डातील व्यापारी भवन येथे नुकतीच पार पडली होती. या बंदमध्ये राज्यातील विविध व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. अन्नधान्यावर जीएसटी आकारण्याच्या निषेधार्थ राज्यातील व्यापार्यांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला. त्यानंतर, राज्यातील जीएसटी कार्यालयातील अधिकार्यांना निवेदन देण्यात आले होते.
पंतप्रधान, केंद्रीय मंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना पत्र
नॉन ब्रँडेड मालाला नव्याने पाच टक्के जीएसटी लावण्याच्या निर्णयामुळे तांदूळ, गूळ, डाळ, गहू, गव्हाचे पीठ, तृणधान्य, मखाना ,राई, बार्ली, पनीर, दही व इतर जीवनावश्यक वस्तूंचे भाव भरमसाट वाढणार आहे. त्यामुळे, महागाईमध्ये आणखी भर पडणार आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकर्यांना 5 टक्के भाव कमी मिळून ग्राहकांना 5 टक्के जास्त द्यावे लागणार असून, व्यापारीवर्गालाही त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे शेतकरी, व्यापारी व ग्राहक यांचा जीएसटीवाढीला सक्त विरोध असून हा निर्णय मागे घ्यावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दि फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्स महारार्ष्ट्च्या वतीने पत्र पाठविण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष वालचंद संचेती यांनी दिली.