

पुणे; पुढारी वृत्तसेवा: गेल्या दोन-तीन दिवसांपासून सलग कोसळणार्या पावसाने गुरुवारी (दि.14) सकाळी काहीशी उघडीप दिली. परंतु दुपारी चारनंतर पाऊस पुन्हा सुरू झाला. संततधार पावसामुळे वाहनचालकांसह नागरिकांची पुरती धांदल उडाली. शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचले होते. अनेक भागांत झाडे पडली तर एका वाड्याचीही भिंत कोसळली. हवामान खात्याने आगामी दोन दिवस पुणे शहरात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गुरुवारी पावसाने सकाळच्या सुमारास उघडीप दिली. मात्र, दुपारनंतर पावसाला सुरवात झाली. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांच्या नाकी नऊ आले.
तसेच शहरात जुन्या वाड्यांच्या भिंती कोसळण्याच्या आणि झाड पडण्याच्या घटना घडल्या. मात्र, सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
वाड्याची भिंत कोसळली अग्निशामक दलाकडे गुरुवारी दिवसभरात झाडे पडल्याच्या 10 घटनांची नोंद झाली. कोंढवा गावठाण येथे वाड्याची भिंत पडली. शेजारी असलेल्या घरावर ही भिंत पडल्यानंतर घरातील 11 रहिवाशांना जवानांनी सुखरूप बाहेर काढले.
ठिकठिकाणी वाहतूक कोंडी
पावसामुळे शहरात बहुतांश ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला होता. यात मुख्यत्वे करून शहरातील प्रसिद्ध असलेल्या रस्त्यांचा समावेश होता. बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, शास्त्री रस्ता, टिळक रस्ता, लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, जंगली महाराज रस्ता, शंकरशेठ रस्ता, सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, सेनापती बापट रस्ता, लॉ कॉलेज रस्त्यासह फर्ग्युसन रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. स्वारगेट चौकासह पुणे रेल्वे स्थानक परिसरात वाहतूक कोंडी झाली होती.
या ठिकाणी पडली झाडे
1) दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आवार
2) वाकडेवाडी, इराणी वस्ती
3) कोंढवा खुर्द, दत्त मंदिरासमोर
4) वानवडी, आझादनगर
5) औंध, परिहार चौक
6) एरंडवणा, इन्कम टॅक्स गल्ली
7) औंध रोड, शेवाळे हॉस्पिटल
8) भवानी पेठ, जुना मोटार स्टँड
9) हांडेवाडी रोड, सातवनगर
10) कात्रज भाजी मंडई