

पुणेः पुढारी वृत्तसेवा : शहरातील विविध भागांत चंदनचोरी करणार्या टोळीला गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने अटक केली. सहा गुन्ह्यांचा छडा लावत त्यांच्याकडून 3 लाख 91 हजार 530 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. टोळीने दत्तवाडी, डेक्कन, बंडगार्डन, वानवडी, उत्तमनगर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत चंदनचोरी केल्याचे समोर आले आहे. लहू तानाजी जाधव (वय 32), महादेव तानाजी जाधव (वय 30), हनुमंत रमेश जाधव (वय 30, राहणार सर्व चौफुला चौक, पेट्रोल पंपामागे धायगुडेवाडी, ता. दौंड), रामदास शहाजी माने (वय 28, रा. मोडवे, खोमणेवस्ती, ता. बारामती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
एनडीए व सहकारनगर परिसरातील एका शाळेच्या आवारातून चोरी झालेल्या चंदनचोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करीत असताना अशोक मच्छिंद्र तांदळे (वय 30, रा. कोल्हेवाडी) याला अटक केली. एनडीएमधील चंदनाचे झाड विक्रीसाठी त्याच्याकडे आल्याचे सांगितले. त्याने ते एका दुसर्या व्यक्तीला विकले होते. त्यानुसार त्या व्यक्तीचा शोध घेतला; मात्र तो मिळून आला नाही. त्याच्या घरातून पोलिसांनी वजनकाटा व चंदनाचे लाकूड जप्त केले होते.
उत्तमनगर पोलिस ठाण्यातील चंदनचोरीचा गुन्हा उघडकीस आल्यानंतर त्याचा तपास करीत असताना, पोलिसांना सिंहगड रोडवरील पु. ल. देशपांडे उद्यानाजवळ चंदनाची चोरी करणारी टोळी हत्यारासह थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत 3 वाकस, कुर्हाड व रिकामी पोती मिळून आली. ही कामगिरी पोलिस निरीक्षक अनिता मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, गुंगा जगताप, कर्मचारी संतोष क्षीरसागर, राजेंद्र मारणे, शरद वाकसे यांच्या पथकाने केली.
दिवसा रेकी अन् रात्री चोरी
चंदनचोरी करणारी टोळी दिवसा विविध कारणांतून चंदनाची झाडे असलेल्या ठिकाणी रेकी करीत असे. त्यानंतर रात्रीच्या वेळी झाडाला गिरमिट लावून किंवा करवतीने कापून गाभा असलेल्या झाडांचीच ते चोरी करीत होते. चोरी केलेला माल एजंटमार्फत विक्री केला जात असे.