

ओतूर, पुढारी वृत्तसेवा : सुमारे 35 वर्षांपूर्वी हिंदू मराठा समाजाचे खामुंडी (ता. जुन्नर) येथील दत्तात्रय खंडू कदम यांचा वायरमनचे धोकादायक काम करताना खांबावरून खाली पडून मुंबई या ठिकाणी दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला होता. मंजुळाबाई खंडू कदम या मातेचे सांत्वन करताना एका मुस्लिम समाजातील मित्राने मातेला शब्द दिला होता की, 'तुझा मुलगा गेला असला, तरी त्याच्या रूपाने आजपासून मीच तुझा मुलगा असून, मुलाचे कर्तव्य कदापीही विसरणार नाही.' त्याप्रमाणे या मुलाने मानलेल्या आईचा व्यवस्थित सांभाळ करीत तिच्या निधनानंतर दशक्रिया विधीला हिंदू धर्मशास्त्रप्रमाणे मुलगा या नात्याने मुंडणही केले.
या मुस्लिम समाजातील मुलाबाबत सर्व स्तरांतील व विविध धर्मीयांमधून कौतुक व्यक्त केले जात असून, यानिमित्ताने हिंदू-मुस्लिम ऐक्याचे हे आदर्श उदाहरण असल्याचे बोलले जात आहे. इक्बाल शेख असे या मुलाचे नाव असून, आईला दिलेले वचन मुलाने अखेरपर्यंत पाळले. आईच्या शेवटच्या क्षणापर्यंत मुलगा म्हणूनच त्याने आपले कर्तव्य पार पाडले. मागील काळात आईने देखील या मुलाला माया, ममता, वात्सल्याने आपलेसे केले असल्याचे आज हा मुलगा अभिमानाने सांगतो आहे.
दहा दिवसांपूर्वी मंजुळाबाई खंडू कदम यांचे 93 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या दशक्रिया विधीच्या दिवशी खामुंडी या गावी त्या मातेला दिलेल्या वचनातून उतराई होण्यासाठी हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे मुस्लिम मुलाने मुंडण करून पिंडदान केले आणि त्या मातेच्या वचनातून मुक्त होण्याचा हृदयस्पर्शी प्रयत्न केला. इक्बाल शेख यांचे मूळ गाव गायमुखवाडी (ता. जुन्नर) असून, खामुंडी ते गायमुखवाडी हे अंतर केवळ 3 किलोमीटर इतकेच आहे.