पुणे : हरिश्चंद्री फाट्यावर सलग तिसर्‍या सोमवारी वाहन उलटले

सातारा महामार्गावर हरिश्चंद्री (ता. भोर) येथे उलटलेला ट्रक.
सातारा महामार्गावर हरिश्चंद्री (ता. भोर) येथे उलटलेला ट्रक.

नसरापूर, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि ठेकेदार यांनी अपघातप्रवण क्षेत्र हरिश्चंद्री येथे ठोस उपाययोजना न केल्याने अपघाताची मालिका सुरूच आहे. हरिश्चंद्री फाटा महामार्गावर वारंवार वाहने उलटलण्याचे प्रकार घडत आहेत. सोमवारी (दि. 25) सायंकाळी ट्रक मध्यभागी उलटला. यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. सलग तिसर्‍या आठवड्यात हरिश्चंद्री येथे वाहन उलटल्याची घटना घडली.

सातारा बाजूकडे जाणारा मालवाहतूक ट्रक (यूपी14 एचटी 2644) हरिश्चंद्री फाट्यावर सातारा महामार्गाच्या मधोमध उलटला. या अपघातात चालक सद्दाम हुसेन नूर आली (वय 22, रा. सरणे आत्मज, ता. गौरीगंज, जि. अमेठी) हा जखमी झाला. सोमवारी (दि. 25) सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, दि. 11 व दि. 18 रोजी याच ठिकाणी चालकांचे नियंत्रण सुटून काल उलटली होती.

दरम्यान, अपघातानंतर महामार्ग वाहतूक विभाग व राजगड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन क्रेनच्या साह्याने ट्रक सेवा रस्त्याच्या बाजूला घेतला. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. दरम्यान, महामार्गावरील हॉटेल रेणुका ते हरिश्चंद्री फाट्यापर्यंत अद्यापही रिफ्लेक्टर, सूचना फलक लावण्यात आलेले नाहीत. याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याबाबत आंदोलनाचा इशारा हरिश्चंद्री ग्रामस्थांनी दिला आहे.

हरिश्चंद्री फाट्यावरील अपघातप्रवण क्षेत्रात उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वेळोवेळी पत्राद्वारे पाठपुरावा केला आहे. सदर ठिकाणी ब्रिंकलर लाइट व रबलिंग 25 एमएम जाडीचे असणे आवश्यक आहे.

                                     – अस्लम खतीब, सहायक पोलिस निरीक्षक, महामार्ग वाहतूक

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news