पुणे : स्पीकर चोरीवर ‘तेरी भी चूप; चौकशी समिती सात महिन्यांपासून कागदावरच

पुणे : स्पीकर चोरीवर ‘तेरी भी चूप; चौकशी समिती सात महिन्यांपासून कागदावरच

हिरा सरवदे

पुणे : महापालिकेच्या पद्मावती येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहातील स्पीकर चोरीवर महापालिका प्रशासनाने 'तेरी भी चूप, मेरी भी चूप' अशीच भूमिका घेतल्याचे समोर आले आहे. चोरीच्या चौकशीसाठी जाहीर केलेली समिती गेल्या सात महिन्यांपासून कागदावरच आहे. चौकशी समिती नेमण्यासाठी प्रशासनाला अद्याप मुहूर्त मिळाला नाही. याबाबत प्रशासनाकडून वेळकाढूपणा केला असल्याने स्पीकर चोरांचे फावले आहे. अण्णा भाऊ साठे सभागृहात महापालिकेने लाखो रुपये खर्चून एका नामांकित कंपनीच्या उच्च दर्जाची साउंडव्यवस्था बसविली होती.

मात्र, कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात येथील उच्च दर्जाच्या 12 साउंडमधील नामांकित कंपनीचे स्पीकर चोरून त्या ठिकाणी हलक्या दर्जाचे स्पीकर बसविण्यात आल्याचे नोव्हेंबर 2021 मध्ये उजेडात आले होते. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सुभाष जगताप यांनी मुख्य सभेत स्पीकर चोरीचा मुद्दा उपस्थित करून प्रशासनाला धारेवर धरले होते. सभागृहाच्या सुरक्षेसाठी चोवीस तास सुरक्षारक्षक तैनात असताना चोरी झालीच कशी, असा सवाल उपस्थित करीत जगताप यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

तत्कालीन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याप्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे व त्याबाबत अहवाल देण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानंतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशी समिती नेमून त्याचा अहवाल पोलिसांना सादर केला जाणार होता. त्यानंतर पोलिसांकडून कारवाई केली जाणार होती. मात्र, गेल्या सात महिन्यांपासून प्रशासनाला चौकशी समिती नियुक्त करण्यास मुहूर्तच मिळालेला नाही. त्यामुळे ही समिती अद्यापही कागदावरच आहे. तसेच, चोरट्यांनी सभागृहातील सीसीटीव्हीची तोडफोड करून स्पीकर चोरी केले. दुसरीकडे, त्या वेळी कार्यरत असणार्‍या सुरक्षारक्षकांचे हजेरीपत्रकच उपलब्ध नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या सर्व प्रकारामुळे चोरीमध्ये त्या वेळी कार्यरत असणार्‍या कर्मचार्‍यांचाच 'हात' असण्याचे स्पष्ट होत आहे. यामध्ये अनेकांचे उकळ पांढरे केल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. सभागृहातील साउंड चोरीची तक्रार पोलिस ठाण्यात देण्यात आलेली आहे. पोलिसांनी अद्याप चोरांवर कारवाई केलेली नाही. असे असताना महापालिकेच्या विद्युत विभागाने चोरी केलेल्या साउंडमध्ये पुन्हा त्याच नामांकित कंपनीचे महागडे स्पीकर बसविण्यासाठी जवळपास 10 लाखांची निविदा काढली आहे. हे नवीन स्पीकर बसविण्याचे काम मंगळवारपासून सुरू केले जाणार असल्याचे विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदुल यांनी सांगितले. चोरी गेलेल्या स्पीकरच्या तपासाबाबत मात्र कंदुल यांनी पोलिस तक्रार दिली. मात्र, पुढे का़य झाले आपणास माहिती नाही, असे सांगितले.

प्रशासनाची कबुली
साउंडमधील स्पीकर चोरी केल्यानंतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अद्याप कोणावरच कारवाई केलेली नाही. मात्र, चौकशीसाठी सामान्य प्रशासनाने अद्याप समिती नेमलेली नाही. आम्ही पाठविलेली फाईल, सामान्य प्रशासनाने पुन्हा परत पाठविल्याचे महापालिकेचे क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे यांनी दिली आहे.

लॉकडाऊनच्या काळात जरी सभागृह बंद असले, तरी सभागृहाच्या संपूर्ण परिसरात लाखो रुपये खर्चून सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. चोवीस तास सुरक्षारक्षक तैनात होते. असे असताना तब्बल बारा साउंड बॉक्समधील महागडे स्पीकर चोरीस गेले. एवढेच नव्हे तर बनावट स्पीकर त्यात बसविले. या सर्व प्रक्रियेला बराच कालावधी लागतो. कुंपणानेच शेती खाल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्या वेळी ज्या ठेकेदाराची सुरक्षा सभागृहाला होती, त्या ठेकेदाराकडून चोरी गेलेल्या स्पीकरची किंमत वसूल करावी.

                                                          – सुभाष जगताप, माजी नगरसेवक

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news