

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा: सिंहगड रस्ता परिसरातील धायरी, दळवीनगर परिसरातील रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा निधी ओतून पावसाळी लाईन, ड्रेनेज लाईन, रस्त्यांची कामे केल्याचा दावा फोल ठरला आहे. सध्या काही रस्त्यांवर मुरूम टाकून रस्ता दुरुस्त केला जात असला तरी, ही केवळ मलमपट्टी (फार्स) ठरत असून, रस्ते दुरुस्ती ही खडी, सिमेंटचे जुने ब्लॉक टाकून करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. धायरी येथील दळवीनगर ते बारांगणी रोड, उंबर्या गणपती चौक ते डीएसके विश्व संकुल, अंबाईदरा रोड आदी रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. खड्डे पडून पाण्याची मोठमोठी डबकी, तळी साचली आहेत.
पाणी वाहून जाण्यासाठी गटारे, भूमिगत लाईन तसेच डांबरीकरणावर लाखो रुपये खर्च करूनही रस्ते अनेक ठिकाणी पाण्यात बुडाले आहेत. बारांगणी मळ्यात खोल खड्ड्यात तळे निर्माण झाले आहे. अशा खड्ड्यांतून प्रवास करताना दुचाकीचालक, रिक्षाचालकांना अक्षरश: कसरत करावी लागत आहे. अनेक वाहनांचे अपघातही होत आहेत. याबाबत खडकवासला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष काकासाहेब चव्हाण यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. ते म्हणाले, 'मुरुम टाकून तात्पुरते खड्डे बुजवण्यात येत आहेत. मात्र, पावसामुळे मुरूम बाजूला पडून तिथे पुन्हा मोठा खड्डा पडत आहे.
त्याऐवजी जुने ब्लॉक, खडी टाकून खड्डे बुजवण्यात यावेत.' तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी शहराध्यक्षा स्वाती पोकळे यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला खोल गटारे तसेच आवश्यक ठिकाणी सिंमेट काँक्रीटचा रस्ता करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतीक पोकळे व स्थानिक कार्यकर्त्यांनी याबाबत पालिकेच्या पथ विभागाला निवेदन दिले आहे. 'डीएसके रोडवरील खड्डे मुरूम टाकून बुजवण्याचे काम सुरू केले आहे. पावसाळा संपल्यानंतर या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. असे पालिकेच्या अधिकार्यांनी सांगितले.