

नसरापूर, पुढारी वृत्तसेवा : सोने व्यवसायात 80 लाखांचा गंडा घालून फरार झालेल्या बापलेकाला राजगड पोलिसांनी अटक केली. त्यानंतर फसवणूक झालेल्या तक्रारदारांची वाढलेली संख्या, वाढलेल्या रकमा, यामुळे या गुन्ह्याची व्याप्ती वाढली आहे. राजगड पोलिसांनी या कामी न्यायालयाकडे पुन्हा आरोपींच्या पोलिस कोठडीची मागणी केली. त्यामुळे भोर न्यायालयाने आरोपींना तिसर्यांदा चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. बाबूसिंग केशरसिंग चौहान (वय 57), शैलेंद्र ऊर्फ शैलेश बाबुसिंग चौहान (वय 22, रा. तवाव, ता. जसवंतपूर, जि. जालोर, राजस्थान) अशी या बापलेकांची नावे आहेत.
नसरापूर येथे बनेश्वर ज्वेलर्स नावाने सोन्या चांदीचे व्यवहार करताना आरोपींनी अनेकांना लाखोंचा गंडा घातला. त्यानंतर ते फरार झाले. पोलिसांनी त्यांना अटक केल्यानंतर त्यांच्यावर नव्याने गुन्हे दाखल होत आहेत. या प्रकरणी पुढारीने आवाज उठविल्याने तक्रारदार स्वतःहून पुढे येत आहे. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार मंगेश याचा शोध सुरू आहे.
राजगड पोलिसांनी राजस्थानमध्ये जाऊन आरोपींना ताब्यात घेतले. बुधवारी (दि. 20) त्यांना राजगड पोलिस ठाण्यात आणले होते. भोर न्यायालयात त्यांना हजर केले असता न्यायालयाने त्यांना दि. 23 पर्यंत कोठडी सुनावली. त्यानंतर न्यायालयाने पुन्हा दि. 25 पर्यंत तीन दिवसांची कोठडी दिली. त्यानंतर आरोपींविरुद्ध वाहन विक्रीत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने अधिक तपासासाठी न्यायालयाने आरोपींना दि. 28 पर्यंत तिसर्यांदा कोठडी सुनावली. पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय सुतनासे, पोलिस हवालदार शरद धेंडे तपास करीत आहेत.