पुणे : सीबीएसईचा दहावी, बारावीचा निकाल जाहीर

पुणे : सीबीएसईचा दहावी, बारावीचा निकाल जाहीर
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) वतीने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत 94.40 टक्के विद्यार्थी, तर बारावीच्या परीक्षेत 92.71 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 'सीबीएसई'तर्फे शुक्रवारी सकाळी बारावीचा, तर दुपारी दहावीचा निकाल ऑनलाइनद्वारे घोषित करण्यात आला. महाराष्ट्राचा समावेश असलेल्या पुणे विभागाचा दहावीचा निकाल 97.41 टक्के, तर बारावीचा निकाल 90.48 टक्के लागला. देशपातळीवरील दहावीच्या निकालात 2 लाख 36 हजार 993 विद्यार्थ्यांना, तर बारावीच्या 1 लाख 34 हजार 797 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा सीबीएससीने दहावी आणि बारावीच्या परीक्षा पद्धतीत बदल करून दोन सत्रांची परीक्षा घेतली. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत निकाल यंदा लांबल्याने विद्यार्थी आणि पालकांना निकाल कधी जाहीर होणार, याची उत्सुकता होती. या पार्श्वभूमीवर सीबीएसई परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षांचा निकाल जाहीर केला. देशपातळीवरील एकूण निकालाचा गेल्या वर्षीच्या तुलनेत आढावा घेतला असता, दहावीचा निकाल 4.64 टक्के, तर बारावीचा निकाल जवळपास सहा टक्क्यांनी घटला आहे.

बारावीच्या परीक्षेत देशातील 14 लाख 35 हजार 366 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, त्यातील 13 लाख 30 हजार 662 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर 20 लाख 93 हजार 978 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली, त्यातील 19 लाख 76 हजार 668 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेच्या निकालानंतर, तसेच आयसीएसईच्या दहावीच्या निकालानंतर सर्वांना प्रतीक्षा लागली होती ती 'सीबीएसई'च्या परीक्षेच्या निकालाची. देशातील 22 हजार 731 शाळांमधून तब्बल 21 लाख 9 हजार 208 विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. तर बारावीच्या परीक्षेसाठी 14 लाख 44 हजार 341 विद्यार्थ्यांची नोंद झाली होती.

सीबीएसईच्या पुणे विभागात महाराष्ट्र, गोवा, दीव-दमण, दादरा आणि नगर हवेली यांचा समावेश आहे. सीबीएसईने दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोन सत्रांत स्वतंत्रपणे घेतल्या असल्या, तरी अंतिम निकालात लेखी परीक्षेला पहिल्या सत्रात 30 टक्के आणि द्वितीय सत्राला 70 टक्के गुणभार देण्यात आला. तर प्रात्यक्षिक परीक्षेसाठी दोन्ही सत्रांना समान महत्त्व देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सत्र परीक्षेतील गुणांवर समाधानी नसलेल्या विद्यार्थ्यांनी पूनर्मूल्यांकन करून घेतल्यास पूनर्मूल्यांकनात विद्यार्थ्यांचे गुण वाढले असल्यास वाढीव गुण आणि गुण कमी झाले असल्यास पूर्वीचे गुण विचारात घेण्यात आले. त्यानुसार, दोन्ही सत्रांचा निकालातील गुण विचारात घेऊन अंतिम निकाल तयार करण्यात आल्याचे सीबीएसईने प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केले.

दहावीचा निकाल
दहावीच्या 2020 मधील निकालाच्या तुलनेत 2022चा निकालात 2.94 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2020 मध्ये दहावीचा निकाल 91.46 टक्के लागला होता. परदेशातील शाळांमधून 24 हजार 843 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यातील 24 हजार 169 विद्यार्थी म्हणजेच 97.29 टक्के विद्यार्थी परीक्षेत यशस्वी ठरले आहेत. परीक्षा दिलेल्या 95.21 टक्के विद्यार्थिनी, तर 93.80 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थिनींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी विद्यार्थ्यांच्या तुलनेत 1.41 टक्क्यांनी जास्त आहे.

बारावीचा निकाल
बारावीच्या 2020 मधील निकालाच्या तुलनेत यंदाचा निकाल 3.93 टक्क्यांनी वाढला आहे. 2020 मध्ये 88.78 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. परदेशातील शाळांमधून 18 हजार 774 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली, त्यातील 17 हजार 644 विद्यार्थी (93.98 टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. बारावीच्या परीक्षेत 94.54 टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थिनींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 3.29 टक्क्यांनी अधिक आहे. या परीक्षेत 91.25 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news