पुणे : सिंहगड, अक्कलकोट निवासस्थाने बंदच

पुणे : सिंहगड, अक्कलकोट निवासस्थाने बंदच
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पुणे विभागांतर्गत असलेली सिंहगड आणि अक्कलकोट ही दोन्ही निवासस्थाने वर्षभरानंतरही बंदच आहेत. एमटीडीसीकडून मात्र पाणी, वीज आणि अपुरे बांधकाम अशा तांत्रिक कारणांमुळे दोन्ही निवासस्थाने अद्यापही सुरू करण्यात आली नसल्याचे कारण देण्यात आले आहे. महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या पुणे विभागांतर्गत महाबळेश्वर, पानशेत, माथेरान, माळशेज, कार्ला, भीमाशंकर आणि कोयनानगर अशी सात निवासस्थाने होती. त्यामध्ये मागील वर्षी जानेवारी महिन्यात सिंहगड आणि अक्कलकोट या दोन निवासस्थानांची भर पडल्याने महामंडळाच्या पुणे विभागांतर्गत एकूण नऊ निवासस्थाने झाली आहेत. सिंहगड निवासस्थान हा बंगला पूर्वी रेव्हेन्यू वेल्फेअर असोसिएशनचा साधा बंगला होता.

त्याच्या खोल्यादेखील सध्या होत्या. यापूर्वी हा पूर्वी बंगला भाडेतत्त्वावर दिला जात होता. गेल्या वर्षी त्याचे नूतनीकरण करण्यात आले. गडावर पर्यटनची 32 गुंठे जागा आहे. या जागेवर महामंडळाकडून पर्यटक निवास बांधण्यात आले होते. राज्य सरकारच्या 'पर्यटन'च्या नवीन धोरणानुसार पर्यटक निवासाची दुरुस्ती आणि श्रेणीवाढ करणे आवश्यक होते. त्यानुसार, पर्यटक निवासांची कामे महामंडळाने केली आहेत.

या पर्यटक निवास इमारतीची श्रेणीवाढ करताना इमारतीमध्येच दोन सूट, एक व्हीआयपी सूट, एक लोकनिवास (डॉरमेटरी), व्यवस्थापक कक्ष, उपाहारगृह आणि डायनिंगची सुविधा केली आहे. दोन सूट, व्हीआयपी सूट वातानुकूलित केला आहे. सूटमध्ये आकर्षक सिलिंग, आधुनिक फर्निचर बनविले आहे. एका वेळी आठ पर्यटक येथे राहू शकतात. दरम्यान, अक्कलकोट येथील निवासस्थानात सात खोल्या असून निवासस्थानाची अंतर्गत कामे अपूर्ण आहेत. श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शासकीय निवासाचे पर्यटन महामंडळाचे हे निवासस्थान तातडीने सुरू करण्याची मागणी होत आहे.

13 ऑगस्टपासून लागून आलेल्या सुट्यांमुळे पुणे विभागातील महामंडळाची निवासस्थाने 80 टक्के आरक्षित झाली आहेत. पुणे विभागातील एकूण निवासस्थानांपैकी सिंहगड आणि अक्कलकोट ही दोन निवासस्थाने अद्याप सुरू करण्यात आलेली नाहीत. सिंहगड येथील निवासस्थानी वीज आणि पाण्याची समस्या आहे. या समस्यांचे निराकरण करण्याची कार्यवाही सुरू आहे, तर, अक्कलकोट येथील निवासस्थानाचे बांधकाम अद्याप अपूर्ण आहे. परिणामी, ही दोन निवासस्थाने अद्याप खुली करण्यात आलेली नाहीत.

                        – मौसमी कोसे, एमटीडीसी पुणे विभाग, प्रादेशिक व्यवस्थापक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news