पुणे : सासवडला 13, 14 ऑगस्टला साहित्य संमेलन

पुणे : सासवडला 13, 14 ऑगस्टला साहित्य संमेलन

सासवड, पुढारी वृत्तसेवा : आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सासवड यांच्या संयुक्त विद्यमाने आचार्य अत्रे यांची 124 वी जयंती आणि 24 वे आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन दिनांक 13 व 14 ऑगस्ट रोजी सासवड येथे केले आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते, साहित्य परिषद सासवड शाखेचे अध्यक्ष अ‍ॅड. अण्णासाहेब खाडे यांनी ही माहिती दिली.

सासवड (ता. पुरंदर) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात हे संमेलन होणार आहे. शनिवारी (दि. 13 ऑगस्ट) प्रतिष्ठानमधील आचार्य अत्रे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येईल. संमेलनाचे उद्घाटन श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे यांचे हस्ते शनिवारी दुपारी 4 वाजता होणार असून, कोल्हापूर येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे हे संमेलनाध्यक्ष आहेत. स्वागताध्यक्षपदी पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंत यशवंत ताकवले यांची निवड झाली आहे. उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय जगताप, माजी आमदार अशोक टेकवडे, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे उपस्थित राहणार आहेत.

सायंकाळी कवी संमेलन

सायंकाळी 6.30 ते 9 या वेळात कवी संमेलन होणार असून, ज्येष्ठ कवी उद्धव कानडे कवी संमेलनाचे अध्यक्ष आहेत. डॉ. स्वप्नील चौधरी, सागर शिंदे, स्वाती बंगाळे, बबन धुमाळ, हनुमंत चांदगुडे, भरत दौंडकर, नीता खरे यांच्यासह स्थानिक कवी राजगौरी जाधव, केशव काकडे, अनिल कदम, अभिषेक अवचार, प्रसन्नकुमार धुमाळ, राजेंद्र सोनावणे, विद्या जाधव, अक्षय कोलते, गौरव नेवसे, प्रशांत बोरा यांचा सहभाग आहे याप्रसंगी कै. सोपानराव लांडगे यांच्या स्मरणार्थ सन 2022 या वर्षातील काव्य पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

रविवारी (दि. 14) सकाळी 10 ते 12 या वेळात 'आचार्य अत्रे यांच्या साहित्यातील जीवन मूल्य' या विषयावर परिसंवाद होईल. मसापच्या कोषाध्यक्ष डॉ. सुनीताराजे पवार प्रमुख पाहुण्या आहेत. प्रा. बाळासाहेब लबडे (गुहागर), प्रा. डॉ. संदीपान नवगिरे (अंबरनाथ), प्रा. वि. दा. पिंगळे (पुणे) आणि प्रा. किरण गाढवे (सासवड) यांचा यामध्ये सहभाग असून, शरदचंद्रजी पवार महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. अरुण कोळेकर संयोजन करतील.

दुपारी 12 ते 1.30 या वेळात ज्येष्ठ विधिज्ञ उल्हास बापट यांची 'प्रचलित न्यायव्यवस्था' या विषयावर अ‍ॅड. दिलीप निरगुडे प्रकट मुलाखत घेतील. सासवड बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. धनंजय भोईटे यांची प्रमुख उपस्थिती आहे. दुपारी 1.30 ते 3.30 या वेळात बाल आनंद मेळाव्याचे आयोजन केले आहे. ज्येष्ठ हास्य कलाकार मकरंद टिल्लू व हर्षदा टिल्लू यांचा 'हसण्याची बाराखडी' हा कार्यक्रम या दरम्यान होईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news