पुणे : सावरदरी ग्रामपंचायतीला स्मार्ट ग्राम पुरस्कार

सावरदरी ग्रामपंचायतीची सुंदर इमारत.
सावरदरी ग्रामपंचायतीची सुंदर इमारत.

भामा आसखेड, पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्याच्या एमआयडीसी क्षेत्रातील महानगाव असा नावलौकिक मिळविलेल्या निर्मलग्राम सावरदरी ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेकडून "स्मार्ट ग्राम" पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती सरपंच भरत तरस व ग्रामविकास अधिकारी श्रीधर नाईकडे यांनी दिली.

खेडच्या एमआयडीसी टप्पा क्रमांक दोनमध्ये सावरदरी ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. पुणे जिल्हा परिषदेकडून "स्मार्ट ग्राम" म्हणून सावरदरी ग्रामपंचायतीची घोषणा नुकतीच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केली. शिरूर तालुक्याचे गटविकास अधिकारी यांच्या टीमने सावरदरी गावात येऊन केलेल्या कामाची तपासणी केली आणि तपासणीचा अहवाल जिल्हा परिषदेकडे पाठविला. गटविकास अधिकारी यांच्यानंतर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही प्रत्यक्ष गावात येऊन संपूर्ण कामाची तपासणी केली. त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद यांनी सावरदरी ग्रामपंचायतीची "स्मार्ट ग्राम" म्हणून घोषणा केली. लवकरच हा पुरस्कार ग्रामपंचायतीचे पदाधिकारी स्वीकारणार आहेत.

गावातील महत्त्वाची विकासकामे

ग्रामपंचायतीने दिशादर्शी कंपोस्ट खत प्रकल्प राबविला, गावातून निघणारा ओला व सुका कचरा संकलन व्यवस्था, ड्रेनेज लाईन काम, दशक्रिया घाट व स्मशानभूमी परिसराची सुधारणा आणि सुशोभीकरणासह महिलांसाठी स्नानगृह, स्वच्छतागृह, गोंधळजाई मंदिराचे काम व परिसरात गार्डन, गावात सिमेंट काँक्रिटीकरणचे रस्ते, सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक शाळा इमारत, नागरिकांना नळाद्वारे पाणी, गावाचा कचरामुक्त परिसर, समाजमंदिर आदी कामांची उभारणी केली.

ओला व सुका कचरा संकलन प्रक्रिया राबविण्यासाठी नागरिकांना आम्ही आवाहन करून सूचना केल्याने त्यांनी त्या तंतोतंत पाळल्या. त्यामुळे ओला व सुका कचर्‍यावर प्रक्रिया करणारा कंपोस्ट खत प्रकल्प राबविला. विशेषतः गावातील तरुणांचे मोठे सहकार्य लाभले. विकासकामांना ग्रामस्थांनी सहकार्य केले. ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य यांचे प्रयत्न, समन्वय यामुळेच गावाला "स्मार्ट ग्राम" पुरस्कार मिळाला.

                                                                              – भरत तरस, सरपंच, सावरदरी

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news