पुणे : सार्वजनिक गणेश मंडळांना महावितरणकडून घरगुती दरानुसार वीज

पुणे : सार्वजनिक गणेश मंडळांना महावितरणकडून घरगुती दरानुसार वीज
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा: गणेशोत्सव काळात म्हणजेच 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबरदरम्यान महावितरणकडून गणेशोत्सव मंडळांना घरगुती वीजग्राहकांप्रमाणेच दर आकारण्यात येणार आहेत. पहिल्या 100 युनिटसाठी केवळ 4 रूपये 71 पैसे प्रतियुनिट, 101 ते 300 युनिटसाठी 8 रुपये 69 पैसे प्रतियुनिट, 301 ते 500 युनिटसाठी 11 रुपये 72 पैसे प्रतियुनिट आणि 500 युनिटपेक्षा अधिकच्या वीजवापरासाठी 13 रुपये 21 पैसे दराने वीजपुरवठा देण्यात येणार आहे.

'सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मंडळांनी सवलतीच्या दराने तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत वीजजोडणी घ्यावी. तसेच, उत्सव मंडळांनी उत्सवातील देखावे, मंडप, रोषणाई व वीज सुरक्षेतील त्रुटीमुळे होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी गांभीर्याने दखल घेऊन उपाययोजना कराव्यात,' असे आवाहन महावितरणने केले आहे. गणेशोत्सवात काही ठिकाणी अधिकृतपणे वीजजोडणी घेतली जात नाही. घरगुती किंवा अन्य मार्गाने घेतलेल्या वीजजोडणीमुळे मोठया प्रमाणात दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण होते.

हे प्रकार टाळण्यासाठी महावितरणतर्फे स्वस्त विजेचे पर्याय गणेश मंडळांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. गणेश मंडळांनी अनधिकृत विजेचा वापर केल्यास भारतीय विद्युत अधिनियम 2003 नुसार कारवाई करण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत पावसाची शक्यता असल्याने गणेश मंडळांनी संभाव्य धोके टाळण्यासाठी वीजयंत्रणेची योग्य ती काळजी घ्यावी. मंडपाची व रोषणाईसाठी विद्युत व्यवस्था व संच मांडणी ही अधिकृत विद्युत कंत्राटदारांकडूनच करून घेणे आवश्यक आहे.

गणेशोत्सव मंडपातील वीजयंत्रणेचे अर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी. मंडळाच्या अंतर्गत वायरचे इन्सुलेशन खराब झाल्यास अशा वायर्समधून मंडपाच्या लोखंडी पर्त्यांमध्ये किंवा ओल्या वस्तूंमध्ये विद्युत प्रवाह येऊ शकतो. हा प्रकार टाळण्यासाठी वायर्सचे जोड काढून टाकावेत किंवा जोड द्यायचा असल्यास योग्य क्षमतेच्या इन्सूलेशन टेपने जोड देण्यात यावा. स्वीचबोर्डच्या मागे प्लायवूड किंवा लाकडी फळी लावल्याची खात्री करून घ्यावी. विजेच्या लघुदाब, उच्चदाब वाहिनी व रोहित्रांचा गणेश उत्सवातील आणि मिरवणुकीतील देखाव्यांना स्पर्श होणार नाही. अशा सुरक्षित अंतरावर देखावे तयार करावेत.

गणेशोत्सवात वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे अत्यावश्यक आहे. वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरू केल्यास एकाच न्यूट्रलमुळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहित होते आणि त्यातून प्राणांतिक अपघात घडतात. त्यामुळे हजारो भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक गणेश मंडळांनी गांभीर्याने दखल घेऊन वीज सुरक्षेबाबत उपाय योजनांमध्ये तडजोड करू नये, असेही सुचवण्यात आले आहे.

गणेशोत्सवाच्या काळात मंडपात शॉर्टसर्किट होणे, विद्युत वायरिंगमध्ये बिघाड होणे आदी कारणांमुळे निर्माण होणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी सर्व गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी संबंधित क्षेत्रातील महावितरणचे अभियंता व कर्मचारी यांचे भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवून ठेवावेत. तसेच, तक्रारींसाठी किंवा तातडीच्या मदतीची गरज भासल्यास 24 तास उपलब्ध असलेले 1912 किंवा 18001023435 किंवा 18002333435 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात
आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news