पुणे : ‘सात-बारा’साठी युनिक आयडी; जिल्ह्यातील जमिनीची कुंडली आता एका क्लिकवर

पुणे : ‘सात-बारा’साठी युनिक आयडी; जिल्ह्यातील जमिनीची कुंडली आता एका क्लिकवर

दिगंबर दराडे

पुणे : इनामी जमिनीसह अन्य वर्गवारीची जमीन चक्क वर्ग एकमध्ये करण्याचे वाढते प्रकार पाहत आता जमिनीच्या सातबाराला 'युनिक नंबर' देण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातील 15 लाख 2 हजार 436 सात-बारांसाठी युनिक नंबर देण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या आहेत. ब सत्ता प्रकारातील शहरी भूखंड भोगवटादार पट्टेधारक, स्थायी- अस्थायी पट्टेधारकांना दिलेले भूखंड, वर्ग 2, कूळ कायदा, प्रकल्पग्रस्त, वतनी, इनामी जमिनींचे व्यवहार करण्यासाठी चक्क वर्ग एक करण्याचे प्रकार शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर झाले. त्यातून खरेदीदारांसह शासनाची होणारी फसवणूक टाळण्यासाठी शहरी भूखंडांसह शेतीच्या सात-बाराला आता 'आधार'प्रमाणे युनिक क्रमांक दिला असल्याची माहिती निवासी जिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी दिली. ही मोहीम जिल्ह्यात लवकरच सुरू केली जात आहे.

राज्यात ग्रामीण भागात सुमारे 2 कोटी 62 लाख सातबारा आहेत. शहरी भागात जवळपास 60 लाख नगर भूमापन क्रमांक आहेत. या सर्वच जमिनींचे कूळ-मूळ ई-चावडी उपक्रमातून एकत्र होणार आहे. या माहितीवर प्रत्येक भूभागाला 11 अंकी स्वतंत्र क्रमांक मिळणार आहे. जमिनींचे कूळ मूळ शोधण्यासाठी शासनाकडून प्रत्येक जमिनीची कुंडली एकत्र करण्याचा ई-चावडी उपक्रम सुरू आहे. आता त्यापुढचे पाऊल टाकत महसूल विभागाने सात-बारावर युनिक नंबर देण्याचा निर्णय घेतला आहे.

नोंदी डिजिटल होतील
या कार्यक्रमांतर्गत जमिनीच्या कागदपत्रांच्या सहाय्याने त्यांच्या नोंदी डिजिटल पद्धतीने ठेवल्या जातील. सर्व जमिनींची डिजिटल नोंद करण्याचे ध्येय आहे. त्यामुळे आता तो दिवस दूर नाही, जेव्हा संपूर्ण देशात आधार कार्ड क्रमांकाप्रमाणेच जमिनीचाही 14 अंकी 'अद्वितीय क्रमांक' अर्थात युनिक आयडी असेल, जो रजिस्ट्री ऑफिस, बँक आणि रेकॉर्ड रूमशी जोडला जाईल. युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर सिस्टममध्ये प्रत्येक प्लॉटसाठी 14 अल्फा-न्यूमेरिक युनिक आयडी असेल. या क्रमांकाच्या मदतीने कोणत्याही व्यक्तीला त्याच्या जमिनीचे रेकॉर्ड किंवा नकाशे कोठूनही सहज मिळू शकतील.

एका क्लिकवर माहिती
येत्या काही दिवसांत फक्त एका क्लिकवर तुमच्या जमिनीशी संबंधित सर्व माहिती तुम्हाला मिळेल. त्याच्या अंमलबजावणीमुळे, मालमत्तेची नोंदणी करणेदेखील सोपे होईल, कारण त्यामुळे तुमच्या सरकारी कार्यालयांच्या अनेक फेर्‍या वाचतील. जमीन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, फक्त एक किंवा दोनदाच तुम्हाला सरकारी कार्यालयात जावे लागेल.

कोणत्याही व्यवहाराने एखाद्या जमिनीची फोड होऊन सात-बारा क्रमांक बदलला किंवा भौगोलिक क्षेत्र बदलले की, नव्याने निर्माण होणार्या सात-बाराला त्याचा स्वतंत्र युनिक नंबर देण्याची सुविधाही या उपक्रमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. जमिनीला युनिक नंबर देण्यासोबतच क्यूआर कोडही तयार होणार आहे.

                                       – नीलप्रसाद चव्हाण, तहसीलदार, कूळ कायदा

या निर्णयाने जमिनीचे चुकीचे व्यवहार रोखण्यास मदत होणार आहे. या नंबरमुळे सात-बारामध्ये पारदर्शकता येईल. विविध सत्ता प्रकारच्या जमिनींची सद्य:स्थिती स्पष्ट होईल. युनिक नंबर सांगितल्यास सात-बाराची सविस्तर माहिती उपलब्ध होईल. सात-बारा अचूकपणे दिसून येईल.

                                                            – डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

तालुकानिहाय सातबारा असे
तालुका सातबारांची संख्या
जुन्नर 15,461
वेल्हा 55270
पुणे शहर 1339
आंबेगाव 118454
शिरूर 118959
खेड 151320
भोर 112319
पुरंदर 107302
बारामती 84208
मावळ 98441
पिंपरी चिंचवड 45601
इंदापूर 85221
दौंड 8403
मुळशी 12225
हवेली 163243

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news