पुणे : साठवणुकीतून शेतकर्‍यांना वित्तीय सहाय्याचे काम कौतुकास्पद; सहकार आयुक्त अनिल कवडे यांचे गौरवौद्वगार

राज्य वखार महामंडळाच्या वर्धापनदिन कार्यक्रमात दीपप्रज्वलन करताना अध्यक्ष दिपक तावरे. यावेळी सहकार आयुक्त अनिल कवडे, सुनिल पवार, रमेश शिंगटे, पुनीत सिंग, सुहास दिवसे व मान्यवर.
राज्य वखार महामंडळाच्या वर्धापनदिन कार्यक्रमात दीपप्रज्वलन करताना अध्यक्ष दिपक तावरे. यावेळी सहकार आयुक्त अनिल कवडे, सुनिल पवार, रमेश शिंगटे, पुनीत सिंग, सुहास दिवसे व मान्यवर.
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा: कृषि क्षेत्रात शेतीच्या अर्थकारणाचा विचार केला तर शेतमाल उत्पादन खर्च कमी करणे आणि शेतमालास चांगला बाजारभाव मिळण्याची अधिक चर्चा होते. कारण शेतीचे अर्थकारण त्यावरच अवलंबून असून याकामी राज्य वखार महामंडळाने शेतमालाच्या साठवणुकीच्या व्यवस्थेसह माहिती-तंत्रज्ञानाची कास धरुन शेतकर्‍यांना वित्तीय सहाय्य मिळवून देण्याचे केलेले काम कौतुकास पात्र असल्याचे गौरवोद्वगार सहकार अनिल कवडे यांनी काढले.

वखार महामंडळाचा 65 वा वर्धापन दिन सोमवारी (दि.8) सायंकाळी त्यांच्या अध्यक्षतेखाली बालगंधर्व रंगमंदिरात संपन्न झाला. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून पणन संचालक सुनिल पवार, पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे, महामंडळाचे माजी अध्यक्ष विश्वास भोसले, नाफेडचे पुनित सिंग, वखार महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिपक तावरे, सह व्यवस्थापकीय संचालक रमेश शिंगटे व मान्यवर उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त ठेवीदार, ठेवीदार संस्था, उत्कृष्ट वखार केंद्रे, विभागीय कार्यालय, सेवानिवृत्त अधिकार्‍यांचा व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

शेतकर्‍यांच्या शेतमालास साठवणुकीद्वारे वाजवी दर मिळण्यासाठी वखार महामंडळ कार्यरत असल्याचे सांगून महामंडळाचे अध्यक्ष दिपक तावरे म्हणाले, समृध्दी महामार्गालगत जांबरगांव (ता.वैजापूर,जि.औरंगाबाद) येथे 50 एकर क्षेत्रात अ‍ॅग्रो लॉजिस्टिक पार्कची उभारणी करण्याचे काम सुरु आहे. तसेच बीड नागझरी (ता.आर्वी,जि.वर्धा) येथे इंटीग्रेटेड कॉटन लॉजिस्टिक पार्क प्रस्तावित आहे. संगणकीय शेतमाल तारण कर्ज योजना (ब्लॉकचेन) राबविणारे अग्रगण्य महामंडळ असून शेतकर्‍यांना तारण कर्जाची मंजूरी व वितरण 24 तासात केले जाते. सद्यस्थितीत 2 हजार 323 शेतकर्‍यांना 51 कोटी 25 लाख रुपयांचे शेतमाल तारण कर्ज वितरित करण्यात आले आहे.

पणन संचालक सुनिल पवार म्हणाले, शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करायचे म्हणजे केवळ बाजारभाव वाढण्याने ते साध्य होणार नाही. देशात शेतमाल काढणीपश्चात सव्वा लाख कोटी रुपयांचा भाजीपाला व फळे आपण फेकून देतो. महाराष्ट्रातील यातील आकडा 35 ते 40 हजार कोटींचा आहे. पुरेशी साठवणुकीची व्यवस्था चांगली केली, उत्पादन वाढविले, निविष्ठांचा खर्च कमी करण्यातून शेतकर्‍यांच्या होणार्‍या बचतीतून आपण त्यांचे उत्पन्न वाढवू शकतो. याकामी वखार महामंडळाचे काम शेतकर्‍यांसाठी फायदेशिर आहे.

पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे म्हणाले, ब्लॉकचेनच्या माध्यमातून शेतमाल तारणावर कर्ज वितरण हे आव्हान स्विकारुन वखार महामंडळाने ते यशस्वी केल्याने राज्यातच नव्हे तर देशातील ते पहिले महामंडळ ठरले आहे. वेअरहाऊसिंगसह अन्य सेवा सुविधाद्वारे कामकाजात व्यावसायिकता आणल्यास महामंडळाच्या यशाची पताका उंच फडकत राहील, असा मला विश्वास वाटतो.
महामंडळाचे सचिव रमेश शिंगटे यांनी आभार मानले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news