पुणे : सवलतीचे उपचार घेणार्‍या रुग्णांसाठी आता तीन महिन्यांचे हमीपत्र, आरोग्य विभागाचा निर्णय

पुणे : सवलतीचे उपचार घेणार्‍या रुग्णांसाठी आता तीन महिन्यांचे हमीपत्र, आरोग्य विभागाचा निर्णय

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरी गरीब योजनेअंतर्गत सवलतीचे उपचार घेणार्‍या रुग्णांची ससेहोलपट थांबावी, यासाठी आता एक महिन्याऐवजी तीन महिन्यांचे हमीपत्र देण्याचा निर्णय आरोग्य विभागातर्फे घेण्यात आला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे शहरी गरीब योजनेअंतर्गत गरजू रुग्णांना सवलतीच्या दरात उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लाभार्थींना योजनेचे स्वतंत्र कार्ड देण्यात आले आहे.

रुग्णांना उपचारांमध्ये सवलत मिळावी, यासाठी दर महिन्याला महापालिकेत येऊन हमीपत्र घेऊन जावे लागते. महिन्याच्या सुरुवातीला होणार्‍या गर्दीमुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांना चार-पाच तास रांगेत उभे राहावे लागते. या योजनेत रुग्ण केमोथेरपी, डायलिसिस अशा महागड्या आजारांचे उपचार घेऊ शकतात. नवीन इमारतीच्या तळमजल्यावर हमीपत्रासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सोमवारी (1 ऑगस्ट) रुग्णांना हमीपत्र देण्यात येणार्‍या कक्षामध्ये मनुष्यबळाची कमतरता होती. त्यामुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांना मनस्ताप सहन करावा लागला.

त्यातील काहींनी आरोग्यप्रमुखांकडे येऊन संताप व्यक्त केला. त्या वेळी हमीपत्रासाठी आता दर महिन्याला हेलपाटे मारण्याची गरज नाही, दर तीन महिन्यांनी पत्र देण्याचा निर्णय घेतला जाईल, असे सांगून आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती यांनी रुग्णांना आश्वस्त केले.
हमीपत्र घेण्यासाठी बर्‍याचदा रुग्णांना स्वत:च यावे लागते. रांग मोठी असल्याने त्यांना दिवसभर थांबून राहावे लागते. रांग संपेपर्यंत संध्याकाळ उजाडली की कक्ष बंद होतो. त्यामुळे रुग्णांना पुन्हा हेलपाटे मारण्याशिवाय पर्याय उरत नाही. रुग्णांसाठी वेगळ्या रांगेची व्यवस्था करावी आणि प्रक्रिया जलद होण्यासाठी मनुष्यबळ वाढवावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

300 ते 400 रुपयांत डायलिसिस
महापालिकेचे कमला नेहरू रुग्णालय, सोनवणे हॉस्पिटल, राजीव गांधी रुग्णालय या ठिकाणी महापालिकेतर्फे 300 ते 400 रुपयांमध्ये डायलिसिसची व्यवस्था करून देण्यात आली आहे. खासगी रुग्णालयांमध्ये एका डायलिसिससाठी 1500 ते 2000 रुपये खर्च येतो.

शहरी गरीब योजनेच्या पत्रासाठी दर महिन्याला येऊ लागू नये म्हणून आता तीन महिन्यांसाठी पत्र दिले जाणार आहे. काही रुग्णालयांनी यास तातडीने होकार कळविला आहे, तर काही रुग्णालयांनी नकार दिला आहे. मात्र, प्राधान्याने हे काम पूर्ण केले जाणार आहे,' असे महापालिकेचे आरोग्य प्रमुख आशिष भारती यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news