

तळेगाव स्टेशन, पुढारी वृत्तसेवा : तळेगाव दाभाडे येथे पोलीस स्टेशन व रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शोभायात्रेचे आयोजन केले होते. ही शोभायात्रा जिजामाता चौक ते सुशीला मंगल कार्यालय पर्यंत आयोजित केली होती.
शोभायात्रेमध्ये नवीन समर्थ विद्यालयाचा राष्ट्रीय शिक्षण देणारी शाळा म्हणून असलेले महत्त्व, शाळेची वैशिष्ट्ये आणि तिच्या स्थापनेमध्ये महत्त्वाचा वाटा असलेले संस्थापक अध्यक्ष लोकमान्य टिळक, संस्थापक चिटणीस गुरुवर्य अण्णासाहेब विजापूरकर तसेच शाळेला भेट देणारे नेताजी सुभाष चंद्र बोस, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच शाळेचा पहिल्या बॅचचा विद्यार्थी क्रांतिरत्न हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे व अन्य समर्थ विद्यालयाशी संबंधित व्यक्तींचा एक जिवंत देखावा असलेला चित्ररथ सहभागी झाला होता. या चित्ररथाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.
या चित्ररथासाठी प्रशालेतील अध्यापक शितोळे रेवाप्पा, प्रभा काळे योगेश पाटील संजय कसाबी संजय सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. मुख्याध्यापक संजय वंजारे संजय आणि पर्यवेक्षक श्री आगळमे भाऊसाहेब यांनी मार्गदर्शन केले तसेच शाळेतील इतर शिक्षक-शिक्षकेतर वृंद यांनी मोलाचे सहकार्य केले. नू. म. वि. प्र. मंडळाचे शालेय समितीचे अध्यक्ष महेश शहा तसेच, नू.म.वि.प्र. मंडळाचे अध्यक्ष बाळा भेगडे, सचिव संतोष खांडगे यांनी विद्यार्थ्यांचे व सहभागी शिक्षकांचे अभिनंदन केले.