पुणे : श्री पंचकेदार मंदिरात ‘दगडूशेठ’ विराजमान

पुणे : श्री पंचकेदार मंदिरात ‘दगडूशेठ’ विराजमान
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा: 'मोरया मोरया, गणपती बाप्पा मोरया'च्या गजरात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा यंदाची सजावट असलेल्या श्री पंचकेदार मंदिरात विराजमान झाले. मुख्य मंदिरापासून कोतवाल चावडी येथील उत्सवाच्या पारंपरिक जागेपर्यंत फुलांनी सजविलेल्या गरुडरथातून श्रींची भव्य आगमन मिरवणूक काढण्यात आली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ट्रस्टच्या 130 व्या वर्षी गणेशोत्सवात श्री पंचकेदार मंदिर साकारण्यात आले आहे. गणेश चतुर्थीला सकाळी 11 वाजून 37 मिनिटांनी गुजरात गिरनार येथील गुरू दत्तात्रेय पीठाधीश्वर स्वामी श्री महेशगिरी महाराज यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना झाली. श्रींच्या मूर्तीसोबत देवी सिद्धी, देवी बुद्धी तसेच गणेश परिवारातील मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या.

या वेळी ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, माणिक चव्हाण, अक्षय गोडसे, अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिष्ठापनेपूर्वी मुख्य मंदिरापासून श्रींची आगमन मिरवणूक सकाळी 8.30 वाजता फुलांनी साकारलेल्या गरुडरथातून काढण्यात आली.

मुख्य मंदिर, आप्पा बळवंत चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा मंडईमार्गे उत्सव मंडपात मिरवणुकीची सांगता झाली. देवळणकर बंधूंचा चौघडा, गायकवाड बंधूंची सनई हे मिरवणुकीच्या अग्रभागी होते. तसेच दरबार बँड, प्रभात बँड आणि गंधाक्ष ढोल-ताशा पथकाचा मिरवणुकीत सहभाग होता. प्रतिष्ठापनेनंतर दुपारी 12.15 पासून भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी गर्दी केली.

अनेक प्रतीकांचा, मूर्ती अन् लक्ष लक्ष दिव्यांचा वापर
भगवान शिवशंकरांचे निवासस्थान असलेल्या हिमालयाच्या सान्निध्यात श्री पंचकेदार मंदिरप्रासाद विराजमान आहे. हे मंदिर केवळ देखावा नसून, या मंदिर उभारणीत अनेक प्रतीकांचा, मूर्तींचा आणि लक्ष लक्ष दिव्यांचा वापर केलेला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा हा श्री पंचकेदार मंदिर राजप्रासाद अनेक देवी-देवतांच्या, व्याल, शार्दूलांच्या, यक्षगणांच्या, सुरसुन्दरी, कमलपुष्पांच्या उत्तुंग शिखरांनी शोभित झाला आहे.

श्री पंचकेदार मंदिर राजप्रासादाच्या उत्तुंग कैलास शिखरावर सुवर्ण कलशाचा आमलक असून, त्यावर सिद्ध ओंकाराच्या त्रिशूल-डमरूच्या ध्वजदंडाने शोभायमान झाला आहे. नागांच्या नक्षीदार लतिन कमानीच्या शिखरावर, चारी दिशांना शिवशक्तीचे अर्थातच शिव-पार्वती मूर्तींचे वास्तव्य आहे. याशिवाय मंदिरामध्ये तसेच रस्त्याच्या दुतर्फा 221 झुंबर लावण्यात आली असून, शिल्पकार विवेक खटावकर यांनी मंदिराचे कलादिग्दर्शन केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news