

वाडा : आदेश भोजने : सह्याद्रीच्या डोंगररांगेत पांडवकालीन लेण्यामध्ये वसलेल्या वाडा येथील श्री क्षेत्र गडदुदेवी देवस्थान परिसरात दमदार पावसाने हजेरी लावल्याने येथील निसर्ग खुलला आहे. डोंगरावरून वाहणारा धबधबा वर्षाविहारासाठी येणार्या पर्यटकांसाठी मोठी पर्वणी ठरत असून येथे मोठ्या प्रमाणात भक्त व पर्यटक भेटी देत आहेत.
खेड तालुक्याच्या पश्चिम भागात वाडा येथील श्री क्षेत्र गडदुदेवी मंदिर हे सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या डोंगरात आहे. हे मंदिर अतिशय पुरातन काळातील असून पांडवकालीन लेणीत आहे. मंदिरापर्यंत जाण्यासाठी खेडवरून वाडा मार्गे, तसेच घोडेगाव येथून देखील जाता येते. हे देवस्थान जागृत असून त्यास निसर्गाने अतिशय मोहक रूप दिले आहे. या देवस्थानाला राज्यभरातून अनेक भाविक येत असतात.
वाडा गावचे उत्तरेला पाच किलोमीटरवर डोंगराच्या कपारीत देवीचे वास्तव्य आहे.
देवीचा परिसरात अनेक पुरातन मंदिरे आहेत. त्यात मरिआई, कळमजाई, राणूबाई इत्यादींसारख्या देवींची मंदिरे आहेत. वाडा हे गाव वायू क्षेत्र असून परिसरातुन भीमा, भामा व आरळा या नद्यांच्या त्रिवेणी संगम असून त्या प्रवाहित झाल्या आहेत. सह्याद्री पर्वत रांगेत वसलेला हा परिसर पावसाळ्यात नेत्रसुख देणारा आहे. जणूकाही निसर्गाने इथे रंगांची उधळण केली असावी असे सध्याचे रूप आहे. निसर्गाची नवलाई इथे साज चढवून बसलेली दिसते. पावसाळ्यात येथील वातावरण आनंददायी मोहक असून अनेक पर्यटकांची इथे मोठी गर्दी पहायला मिळते.
धबधब्याचे फेसाळणारे पाणी व त्याचे उडणारे तुषार यांचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक मंदिराला आवर्जून भेट देत असतात. मंदिरात गडदूबाई व कळमजाईची तांदळे (स्वयंभूमूर्ती) आहेत. दोघींमध्ये शंकर भगवनाची पिंड आहे. समोर शंकर-पार्वतीचे वाहन नंदी व देवीचे वाहन वाघ यांची भव्य अशी दगडातील मूर्ती आहेत. समोर गडदुबाईचा सेवक म्हासोबाचे स्थान आहे. बाजूच्या गुहेत वरसुबाई, काळुबाई आहे. तसेच साडेतीन शक्तीपीठ, विठ्ठल- रुक्मिणी, प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीतादेवी, श्री हनुमान, संतोषीमाता या मूर्तींची प्रतिष्ठापना केलेली आहे.
मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने येथील धबधबा वाहू लागला असून पर्यटकांसाठी मोठी पर्वणी ठरत आहे. पर्यटकानी देवस्थानचे पावित्र राखून परिसरात कोणताही अनुचित प्रकार करू नये. धबधब्याचा आनंद घेतानी काळजी घेणे गरजेचे असल्याचे आवाहन देवस्थानचे ट्रस्टी काळूराम सुपे, बजीरंग सुपे, पूनाजी सुपे यांनी केले आहे.
पुण्यापासून 80 किलोमीटर असून राजगुरुनगर (खेड) मार्गे 28 किलोमीटरवर आहे. तर वाडा येथून उत्तरेस 5 किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र गडदुदेवी देवस्थान आहे.