पुणे : शेतसारा ऑनलाईन भरण्याची सुविधा; पहिल्या टप्प्यात राज्यातील 356 गावांचा समावेश

पुणे : शेतसारा ऑनलाईन भरण्याची सुविधा; पहिल्या टप्प्यात राज्यातील 356 गावांचा समावेश
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा: महापालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्सप्रमाणेच आता जमीनविषयक 'शेतसारा' ऑनलाईन भरण्याची सुविधा भूमिअभिलेख विभागाने सुरू केली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्यातील 356 गावांमध्ये या प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. या गावांमध्ये प्रामुख्याने शेतीचा कर असल्याने आता दुसर्‍या टप्प्यात ज्या गावांमध्ये नागरीकरण झाले आहे, शेती तसेच अकृषिक (एनए) जमिनी आहेत त्या गावांमध्ये या प्रणालीचा वापर मोठ्या करण्यात येणार आहे. त्यासाठी शहरालगतची प्रत्येक जिल्ह्यातील पाच गावे निवडण्यात आली आहेत. यात ऑनलाईन नोटीस बजावून ऑनलाईन कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

भूमिअभिलेखच्या या सुविधेमुळे शेती कर, बिनशेती कर, शिक्षण उपकर, रोजगार हमी उपकर, ग्रामपंचायत उपकर, जिल्हा परिषद उपकर आदी प्रकारचे कर घरबसल्या भरता येणार आहेत. शेतसारा हा पारंपरिक कर आहे. पूर्वी शेतसारा हा महसूल देणारा महत्त्वाचा कर होता. जशी प्रगती होत गेली, तसे नव-नवीन करांची आकारणी सुरू झाली. मात्र, जमिनींवर आकारला जाणार्‍या या कराची वसुली अजूनही सुरू आहे. जमिनीच्या क्षेत्रानुसार कर आकारण्यात येतो. शेतीचा कर हा कमी असल्याने या कराची वसुली अपेक्षित तेवढी होत नाही. थकबाकीची रक्कम मोठी झाल्यावर हा कर वाढत जातो.

थकबाकीची रक्कम ही तलाठी कार्यालयात गेल्यावरच कळते. तसेच, आता घरबसल्या ऑनलाईन सातबारा उतारा असल्याने तलाठी कार्यालयातसुध्दा नागरिकांना जावे लागत नाही. त्यामुळे हा कर वसूल होत नाही. यासाठी आता भूमिअभिलेख विभागाने ई-चावडी या संगणक प्रणालीमध्येच शेतीचा कर ऑनलाईन भरण्याची सुविधा देण्यासाठी काम सुरू केले आहे. त्यासाठी संगणक प्रणाली तयार करण्यात आली आहे.

प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील 356 गावांमध्ये या संगणक प्रणालीचा वापर करून शेतसारा ऑनलाईन भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात किंवा महसूल विभागात रजिस्टर नमुना लिहिण्याची पध्दत वेगळी आहे. यात आलेल्या अडचणी सोडवून संगणक प्रणालीत आवश्यक ते बदल करण्यात आले.

या गावांमध्ये प्रामुख्याने शेतीचा कर आकारण्यात आला. या लहान गावांमध्ये एनए जमिनी नसल्याने आता शहरालगतची गावे निवडून एनए करसुध्दा आकारण्याच्या पर्यायाची चाचणी केली जात आहे. यासाठी तलाठ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात येत आहे, अशी माहिती माहिती भूमिअभिलेख विभागातील अधिकार्‍यांनी दिली.

सुविधेमुळे माहिती एका क्लिकवर
या सुविधेमुळे सर्व्हे नंबरनिहाय अथवा खातेदारनिहाय वार्षिक शेतसार्‍याची रक्कम किती होत आहे, थकीत कर किती आहे, याची माहिती संगणकावर मिळणार आहे. तसेच, जमिनींचा अनधिकृत वापर सुरू असल्याची माहिती मिळणार असून, त्यासाठीचा दंडसुध्दा ऑनलाईन भरता येणार आहे.

पाच गावांची निवड
जमाबंदी आयुक्त कार्यालयाने दिलेल्या सूचनेनुसार शेतसारा ऑनलाईन प्रणालीसाठी शहरलगतची पाच गावे निवडण्यात आली आहेत. प्रत्येक उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील एका गावाची निवड करण्यात आली आहे. यामध्ये हवेलीमधील होळकरवाडी, खेड मधील पाचारणेवाडी, मावळमधील सोमाटणे, इंदापूरमधील मदनवाडी आणि पुरंदरमधील दिवे गावाची निवड करण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news