

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्यात संततधार पावसानंतर गेला आठवडाभर बहुतांश ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्यांचा टक्का आणखी वाढून ताज्या अहवालानुसार 88 टक्क्यांवर पोेहचला आहे. पुढील आठवडाअखेर खरिपातील पेरण्यांचा हंगाम संपुष्टात येईल. सोयाबीनचा पेरा 107 टक्क्यांवर पोहचला आहे. मात्र, खरीप ज्वारी, बाजरी, मुगाचे क्षेत्र घटल्याचे स्पष्ट झाले असून, खरिपातील अखेरच्या टप्प्यात आता सर्वत्र भात लावण्यांना वेग आल्याचे चित्र असल्याचे कृषी आयुक्तालयातून सांगण्यात आले.
खरीप हंगामातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनचे क्षेत्र सुमारे 42 लाख हेक्टर असून, सद्य:स्थितीत 44 लाख 36 हजार हेक्टरवर (107 टक्के) पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. कापसाच्या 42 लाख हेक्टरपैकी 40.13 लाख हेक्टरवरील (95 टक्के) पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. अन्य पिकांमध्ये भात 6 लाख 49 हजार 374 हेक्टर (43 टक्के), खरीप ज्वारी 1 लाख 28 हजार 66 हेक्टर (40 टक्के), बाजरी 3 लाख 32 हजार 797 (49 टक्के), मका 7 लाख 50 हजार 27 हेक्टरवर (84 टक्के) पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
तुरीची 10.56 लाख हेक्टर (81 टक्के), मूग 2 लाख 50 हजार 837 (62 टक्के), उडीद 3 लाख 4 हजार 33 हेक्टर (80 टक्के), याशिवाय भुईमूग 1 लाख 36 हजार 76 हेक्टर (69 टक्के), तीळ 5 हजार 350 हेक्टर (34 टक्के), सूर्यफूल 9 हजार 619 हेक्टरवरील (70 टक्के) पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती कृषी आयुक्तालयातील मुख्य सांख्यिक विनयकुमार आवटे यांनी दिली.
राज्यातील विभागनिहाय पिकांच्या पेरण्यांची स्थिती. (क्षेत्र हेक्टरमध्ये)
विभाग सरासरी पेरणी क्षेत्र प्रत्यक्ष पेरणी टक्के
कोकण 4,16,500 2,70,277 65
नाशिक 21,01,221 18,40,134 88
पुणे 10,65,048 8,81,999 83
कोल्हापूर 7,63,759 6,59,900 86
औरंगाबाद 20,90,198 19,43,190 93
लातूर 27,66,954 25,64,587 93
अमरावती 31,71,785 30,06,472 95
नागपूर 19,12,954 13,73,207 72
एकूण 142,88,418 125,39,764 88