पुणे : शिंदे गावाच्या गायरानातून मुरमाचा उपसा

File photo
File photo
Published on
Updated on

भामा आसखेड, पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्याच्या एमआयडीसी क्षेत्रातील शिंदे गावच्या गायरान परिसरातून दिवसाढवळ्या मुरूम काढणार्‍यांना गावचे सरपंच आणि काही प्रमुख लोकांनी प्रतिबंध करून मुरूम काढण्याचे काम बंद केले. परंतु, स्थानिक तलाठ्याने सरपंचांना फोन करून 'सरकारी कामात अडथळा आणता म्हणून तुमच्यावर कारवाई करण्यात येईल,' असा दम भरला. मुरूम उपशाचे काम बंद केल्यानंतर सरपंच व गावचे प्रमुख लोक निघून जाताच तलाठ्याच्या आदेशाने पुन्हा मुरमाचा उपसा पोकलेन मशिनद्वारे जोरात सुरू झाला.

गावासाठी शासनाने 25 एकर गायरान जमीन दिल्याने त्या परिसरात गावचा दशक्रियाघाट व स्मशानभूमी आहे. त्याच गायरान जमीन परिसरात उत्खनन करून मुरूम नेल्याने जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. रविवारी (दि. 17) सकाळी दशक्रियाघाट परिसरातून पोकलेन मशिनद्वारे मुरूम काढून तीन हायवा ट्रकमधून नेला जात असल्याचे समजताच गावचे सरपंच सचिन देवकर व गावच्या काही प्रमुख लोकांनी घटनास्थळी येऊन मुरूम काढण्याचे काम बंद करून मशिन बाहेर काढून दिल्या.

लगेच स्थानिक तलाठी पवार यांनी सरपंचांना फोन करून सांगितले की, चाकणपासून रस्त्याला पडलेले खड्डे भरण्यासाठी तहसीलदार यांनी येथून मुरूम काढा, असे सांगितल्याने आम्ही तेथून मुरूम काढत आहोत. तुम्ही विरोध करू नका, नाहीतर शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल तुमच्यावर प्रशासकीय कारवाई होईल. त्यानंतर सरपंच देवकर यांनी तलाठी पवार यांना, अन्य गावच्या परिसरातील गायरान क्षेत्रातून मुरूम न्यावा. आमच्याच गायरानमधून का? असा सवाल उपस्थित केला. परंतु, सरपंचांच्या सूचनेला न जुमानता तलाठ्याने फोन करून या व्यक्तीला मुरूम काढण्याचे आदेश केल्याने लगेच मुरमाचा उपसा सुरू झाला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news