

उरुळी कांचन : पुढारी वृत्तसेवा : जेजुरीकडून उरुळी कांचनच्या दिशेने चाललेल्या क्रेनचा शिंदवणे (ता. हवेली) घाटात ब्रेक फेल झाल्याने क्रेन तब्बल सुमारे 200 ते 250 फूट खोल दरीत पडली. ही घटना मंगळवारी (दि. 28) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याला उरुळी कांचन येथील एका दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. संदेश लोंढे (वय 40, रा. बारामती) असे त्याचे नाव आहे.
लोंढे हे जेजुरीकडून उरुळी कांचनच्या दिशेने क्रेन घेऊन निघाले होते. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास क्रेन शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीतील घाटात आली असता उतारावरील वळणावर चालकाने ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र, ब्रेक लागला नाही. यावेळी चालक क्रेनमधून बाजूला पडला. त्यानंतर क्रेन सुमारे 200 ते 250 फुट दरीत जाऊन कोसळली. जखमी चालक संदेश लोंढे याच्यावर उरुळी कांचन येथील दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सदाशिव गायकवाड, सहायक पोलिस उपनिरीक्षक मच्छिंद्र दिवेकर, हवालदार रमेश गायकवाड यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.