वेल्हे, पुढारी वृत्तसेवा : अतिवृष्टीमुळे वेल्हे तालुक्यातील पानशेत भागात रस्त्यांवर दरडी कोसळत आहेत. पासली भागात रस्ते पुरात बुडाल्याने नागरिकांना हलाखीला तोेंड द्यावे लागत आहे.
गुरुवारी (दि.14) सकाळपासून पावसाचा जोर कमी झाल्याने शेतकर्यांना थोडा दिलासा मिळाला. मात्र, दुपारपासून पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला. तोरणा गडाच्या पश्चिमेला असलेला पासली – भुंतोडे रस्ता बालवड येथे ओढ्याच्या पुरात बुडाला आहे. परिणामी खोपडेवाडी, बालवड आदी गावांतील नागरिकांना हलाखीला तोंड द्यावे लागत आहे.
बालवड गावच्या हद्दीतील दोन्ही पूल कमी उंचीचे आहेत, त्यामुळे पुरात बुडून संपर्क तुटला आहे. गेल्यावर्षी येथे पुरात एक शेतकरी वाहून गेला होता, असे स्थानिक कार्यकर्ते प्रकाश जोरकर यांनी सांगितले. वेल्हे-पानशेत रस्त्यावरील कादवे घाटात, तसेच पानशेत- पोळे रस्त्यावर दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे यांनी याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
पासली -भुंतोडे रस्त्यावरील बालवड येथील पुलांच्या मोरीत अडकलेल्या फांद्या, झाडे काढून पाणी जाण्याचा मार्ग मोकळा केला जात आहे. पाऊस अधिक असल्याने स्थानिक नागरिकांना सावधानतेचा इशारा दिल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता संजय संकपाळ यांनी सांगितले. कादवे घाट रस्त्यावर तसेच पानशेत – पोळे रस्त्यावर वरघड येथे कोसळलेल्या दरडी काढल्या आहेत.