

जेजुरी, पुढारी वृत्तसेवा : वाल्हे (ता. पुरंदर) गावच्या नजीक असणार्या अंबाजीचीवाडी शिवारातील एका शेताजवळील पन्नास फूट खोल विहिरीत रविवारी (दि. 17) एक कुत्रा पडला. स्थानिक नागरिक हेमंत सूर्यवंशी व त्यांच्या मित्रांनी पायर्या नसणार्या विहिरीत दोरीच्या साहाय्याने उतरून कुत्र्याला बाहेर काढून त्याचे प्राण वाचविले.
अंबाजीचीवाडी शिवारातील विहिरीवर हेमंत सूर्यवंशी हा तरुण विहिरीवरील मोटार सुरू करण्यासाठी गेला असता त्याला विहिरीत कुत्रे भुंकण्याचा आवाज आला. पायर्या नसणार्या आणि सुमारे 50 फूट विहिरीत कुत्रा पडल्याचे त्याच्या निदर्शनास आले. हेमंतने आपले मित्र गणेश महांगडे, समीर पवार आणि साहिल पवार यांना बोलावून घेतले. विहिरीच्या काठावरील झाडाला दोरी बांधून हेमंत विहिरीत उतरला.
मित्रांनी एका बकेटला दोरी बांधून बकेट विहिरीत सोडले. हेमंतने या कुत्र्याला बकेटमध्ये बसविले. मित्रांनी बकेट विहिरीबाहेर ओढून कुत्र्याला वर आणले. विहिरीचा काठ येताच कुत्र्याने धूम ठोकली. मुक्या जिवाचे प्राण वाचविल्याबद्दल हेमंत सूर्यवंशी व त्याच्या मित्रांचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.