

पुणे : टपाल खात्याने नुकतीच 399 रुपयांत 10 लाखांचा अपघाती विमा देणारी योजना जाहीर केली आहे. मात्र, या योजनेतून दिव्यांगांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे दिव्यांगांना समान संधी, समान सहभाग व हक्क संरक्षण हे कागदावरच असल्याचा आरोप दिव्यांग बांधवांनी केला आहे. टपाल खात्याकडून कमीत कमी रकमेत जास्तीत जास्त परताव्याचे संरक्षण देणारी 10 लाखांच्या अपघाती विम्याची योजना 18 ते 65 वयोगटासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेतून दिव्यांगांबरोबरच साहसी खेळातील खेळाडू, पोलिस, लष्कर, नौदल, हवाई दलातील कर्मचार्यांना डावलले आहे.
बांधकाम मजूर, डॉक्टर यांनाही याचा लाभ मिळणार नाही. योजनेअंतर्गत अपघाती विमा, तसेच मृत्यूपश्चात विम्याची सोय करण्यात आली आहे. कायमचे अपंगत्व आल्यास थेट 10 लाख रुपये वारसांना मिळणार आहेत. लाभदायक विमा योजनेतून दिव्यांगांना वगळण्यात आल्यामागे नेमके काय कारण आहे, याबाबत दिव्यांग हक्क संस्थांनी शासनाला जाब विचारला आहे. कल्याणमधील शंकर साळवे या दिव्यांग तक्रारदाराने पुण्याचे दिव्यांग आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांना पत्र लिहून याबाबत तक्रार केली आहे.
सरकारने कायम दिव्यांगांबाबत उदासीनता दाखवणे योग्य नाही. टपाल खात्याच्या योजनेतून दिव्यांगांना वगळण्यात आल्याने दिव्यांगांना समान संधीच्या घोषणा केवळ कागदावरच राहिल्या आहेत. त्यांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवणे चुकीचे आहे.
– हरिदास शिंदे, अध्यक्ष, दिव्यांग हक्क सुरक्षा समिती.