पुणे विभागात नवीन 43 प्रस्तावांपैकी 12 ऑक्सिजन प्लान्टच सुरू

पुणे विभागात नवीन 43 प्रस्तावांपैकी 12 ऑक्सिजन प्लान्टच सुरू

Published on

दीपेश सुराणा : पिंपरी : पुणे विभागात ऑक्सिजन प्लान्ट उभारण्यासाठी उद्योग विभागाकडे नवीन 43 प्रस्ताव आले होते. मात्र, प्रत्यक्षात त्यातील 12 प्लान्टच सुरू होऊ शकले आहेत. गतवर्षी कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत 407 मेट्रीक टन इतका ऑक्सिजन केवळ वैद्यकीय वापरासाठी लागत होता. मात्र, सध्या हे प्रमाण खुपच कमी झाले आहे. वैद्यकीय वापरासाठी सध्या केवळ 70 ते 80 मेट्रिक टन इतकाच ऑक्सिजन लागत आहे.

वैद्यकीय वापरासाठी लागतोय फक्त 70 ते 80 मेट्रिक टन ऑक्सिजन

गतवर्षी कोरोनाचा उद्रेक वाढल्याने वैद्यकीय कारणासाठी ऑक्सिजनची गरज खुप वाढली होती. रुग्णालयांचे अतिदक्षता विभाग, शस्त्रक्रिया विभाग येथेच सध्या ऑक्सिजन लागतो. मात्र, कोरोनामुळे रुग्णसंख्या वाढल्याने ऑक्सिजन द्याव्या लागणार्‍या रुग्णांची संख्या वाढली होती. सतत येणार्‍या रुग्णवाहिकांच्या आवाजाने काळजात धस्स होत होते. अशा परिस्थितीत ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन सरकारी रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयांनी देखील ऑक्सिजन प्लान्ट उभारले.

पुणे विभागात प्रामुख्याने पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. या पाच जिल्ह्यांसाठी 43 ऑक्सिजन प्लान्ट उभारण्याचे प्रस्ताव आले होते. त्यामध्ये लिक्विड ऑक्सिजन निर्मिती करणार्‍या 9 प्लान्टचा समावेश होता. तर, 5 रिफिलिंग युनिट, 29 एअर सेप्रेशन युनिटचा समावेश होता.
पुणे जिल्हा – 14, सांगली – 10, कोल्हापूर – 6, सातारा – 7 तर, सोलापूर -6 असे युनिट उभारले जाणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात केवळ 12 युनिट उभारले गेले आहेत.

वैद्यकीय वापरासाठी ऑक्सिजनच्या मागणीत घट
पुणे विभागात सध्या असलेल्या ऑक्सिजन प्लान्टमार्फत प्रतिदिन एकूण 432 मेट्रिक टन इतक्या ऑक्सिजनची निर्मिती होत आहे. 432 मेट्रिक टन ऑक्सिजनपैकी गतवर्षी जून-2021 मध्ये वैद्यकीय वापरासाठी तब्बल 407 मेट्रिक टन इतका ऑक्सिजन दिला जात होता. त्यामुळे उद्योगांना होणार्‍या ऑक्सिजन पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला होता. कोरोनाची साथ सध्या नियंत्रणात आहे. पर्यायाने, सद्यःस्थितीत तयार होणार्‍या एकूण ऑक्सिजनपैकी केवळ 70 ते 80 मेट्रिक टन इतकाच ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठी द्यावा लागत आहे. त्यामुळे उद्योगांना सध्या ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात मिळत आहे, अशी माहिती उद्योग विभागाचे (पुणे विभाग) सहसंचालक सदाशिव सुरवसे यांनी 'दैनिक पुढारी'ला दिली.

उद्योग विभागाकडे प्राप्त 43 प्रस्तावांपैकी सद्यःस्थितीत केवळ 12 ऑक्सिजन प्लान्ट सुरू आहेत. उद्योगांना किंवा वैद्यकीय वापरासाठी लागणार्‍या ऑक्सिजनची मागणीनुसारच निर्मिती केली जाते. त्यामुळे जेवढी मागणी आहे तितकाच ऑक्सिजन तयार होतो. त्यापेक्षा आधिक ऑक्सिजन तयार केला जात नाही. त्यामुळे अतिरिक्त ऑक्सिजन तयार होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
                                        – सदाशिव सुरवसे, सहसंचालक, उद्योग, पुणे विभाग.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news