पुणे : विनयभंग, बदनामी, खंडणी, मारहाणीची तक्रार घेण्यास कोंढवा पोलिसांकडून वकील महिलेची टाळाटाळ

पुणे : विनयभंग, बदनामी, खंडणी, मारहाणीची तक्रार घेण्यास कोंढवा पोलिसांकडून वकील महिलेची टाळाटाळ

पुणे; पुढारी वृत्तसेवा: वकीलपत्र सोडण्यासाठी दबाव टाकून विनयभंग करत खंडणीची मागणी केल्याची तक्रार घेण्यास पोलिसांकडून टाळाटाळ झाल्यानंतर न्यायालयात धाव घेतलेल्या वकील महिलेच्या खासगी तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोंढवा पोलिसांना देण्यात आले. कॅन्टोन्मेंट न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी. एन ओंडारे यांनी हे आदेश दिले आहेत.वसीम इकबाल खान (35), नदीम सय्यद (35), भरत जाधव (58) आणि अतिका नदीम सय्यद (32, सर्व रा. सनशाईन हिल्स, पिसोळी गाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणात 156 (3) नुसार खासगी तक्रार अ‍ॅड. साजिद शाह, अ‍ॅड. अमित मोरे यांच्यामार्फत दाखल केली होती.

अ‍ॅड. शाह यांनी सांगितले, तक्रारदार महिला ही वकील असून सोसायटीमधील गैरव्यवहारात सहभागी असलेल्यांविरोधात कारवाई करण्यासाठी सोसायटीतील नागरिकांनी तक्रारदार महिलेची कायदेशीर सल्लागार म्हणून नेमणूक केली होती. याबाबत संशयित आरोपींना समजल्यानंतर त्यांनी तक्रारदारावर व त्यांच्या परिवाराला मानसिक, शारीरिक त्रास देत कायदेशीर मदत न करण्याची धमकी दिली. परंतु आरोपींच्या कोणत्याही दबावाला त्या बळी पडल्या नाहीत. त्यांच्यावर पाळतही ठेवली जात असल्याने त्यांनी याबाबत संशयितांना विचारणा केली. त्यावेळी यातील एकाने मी एका गँगचा सदस्य असल्याचे सांगत ही केस सोडण्याची व तिचे अपहरण करण्याची धमकी दिली.

तक्रारदार महिलेकडे धमक्या दिलेल्याचे रेकॉर्डिंग होते. ते त्यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात दाखवूनही त्यांच्यावर कारवाई झाली नाही.  वरिष्ठांनीदेखील तक्रारीची दखल घेतली नाही. त्यानंतर 16 जानेवारी रोजी आरोपींपैकी एकाने अपमानजनक व अश्लील शब्द वापरून फिर्यादीचा विनयभंग केला. तसेच प्राणघातक हल्ला केल्याचेही न्यायालयीन तक्रारीत म्हटले होते. 9 फेब्रुवारीला त्यांच्या पतीलाही मारहाण करण्यात आली. फेसबुक, यूट्यूब चॅनलच्या माध्यमातूनही बदनामी केली. त्यांच्या घराबाहेरील सीसीटीव्हीही तोडून टाकले, दरवाजा तोडून घरात घुसण्याचा प्रयत्न केल्याचे व पैसे मागत असल्याचे तक्रारीत म्हटले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news