पुणे : वनातून खडी वाहतुकीमुळे चिंकारा गायब

कळस येथील वनातून ठेकेदार कंपनीच्या वाहनांसाठी झाडे बाजूला करून रस्ता तयार केल्याचे दाखवताना बाबामहाराज.
कळस येथील वनातून ठेकेदार कंपनीच्या वाहनांसाठी झाडे बाजूला करून रस्ता तयार केल्याचे दाखवताना बाबामहाराज.
Published on
Updated on

कळस : पुढारी वृत्तसेवा : कळस (ता. इंदापूर) येथील वनजमिनीतून रस्त्याच्या कामासाठी लागणारी खडी वाहणारे ट्रक सर्रासपणे जात असून, वन्यप्राण्यांच्या वास्तव्यावर गदा आली आहे. मात्र, वनविभाग याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप कर्मयोगी कारखान्याचे माजी संचालक बाबामहाराज खारतोडे यांनी केला आहे.

वनातून जाण्यासाठी वनविभागाची परवानगी घेणे आवश्यक असताना येथून सर्रासपणे अवैध वाहतूक सुरू आहे. गावचे ग्रामदैवत हरणेश्वर असल्याने येथील चिंकारा हरणांना अभय आहे, यामुळे या वनात कळपाने चिंकारे आढळून येत होते, परंतु या वाहतुकीमुळे कळपाने दिसणारे चिंकारा सध्या गायब झाले आहेत. वाहनांच्या सोईसाठी अनधिकृत मुरमीकरण करून व झाडे तोडून रस्ता तयार केला आहे. शेतकर्‍यांच्या पाइपलाइनच्या कामाला अवैध ठरवत त्यांच्यावर गुन्हे दाखल करणारा वनविभाग या प्रकाराकडे तक्रार करूनही दुर्लक्ष करत आहे, असे खारतोडे यांनी म्हटले आहे.

वनविभागास 21 फेब्रुवारीला निवेदन देऊन सदर प्रकाराची कल्पना देत कारवाई करण्याची विनंती केली होती. मात्र, वनविभागाने आमच्या अर्जाला केराची टोपली दाखवली. यामुळे जैवविविधतेच्या संवर्धनासाठी वन विभाग उदासीन असल्याचे दिसून येत आहे. खडी क्रशरमालक व ठेकेदार कंपनीने हात ओले केल्यामुळे ही उदासीनता असल्याचे बोलले जात आहे. जैवविविधता धोक्यात येत असलेला हा प्रकार बंद न केल्यास इंदापूर वनविभागाच्या कार्यालयासमोर उपोषण करणार असेही खारतोडे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news