

महाळुंगे पडवळ : पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील वडगाव काशिंबेग ते दत्त मंदिर रस्त्याचे डांबरीकरणाचे काम निकृष्ट झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते निवृत्त एसटी कर्मचारी वसंतराव बाणखेले यांनी केली आहे. सुमारे दीड किलोमीटर लांबीचे डांबरीकरणाचे काम सुलतानपूर ते दत्त मंदिरपर्यंत करण्यात आले आहे.
या कामात डांबरीकरणाची जाडी 20 एमएम असताना ती त्यापेक्षा अतिशय कमी ठेवण्यात आली आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे-झुडपे काढण्यात आलेली नाहीत. साईडपट्ट्यांवर मुरुम टाकण्यात आलेला नाही. अनेक ठिकाणी रस्त्याची रुंदी तीन मीटरपेक्षा कमी आहे. बांधकाम विभागाने कोठेही रस्त्याची माहिती व ठेकेदाराचे नाव असलेला फलक लावलेला नाही.
मंचर बाह्यवळण रस्ता दत्त मंदिराच्या जवळून या रस्त्याला क्रॉस करून जातो. बाह्यवळण रस्त्याच्या बोगद्याच्या दोन्ही बाजूंनी डांबरीकरण ठेवण्यात आलेले आहे. या कामाची चौकशी व्हावी, अशी मागणी वसंतराव बाणखेले यांनी केली आहे.