पुणे : राजगुरुनगर बाह्यवळण पुलाचा स्लॅब कोसळला

File Photo
File Photo

राजगुरुनगर, पुढारी वृत्तसेवा : पुणे-नाशिक महामार्ग चौपदरीकरण कामातील राजगुरुनगर बाह्यवळण रस्त्यावर ओढ्याचा पूल टाकताना स्लॅब कोसळला. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, ठेकेदाराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

राजगुरुनगर बाह्यवळण कामातील रस्त्यावर तुकाईवाडी हद्दीत ओढ्यावर पुलाचा सिमेंट काँक्रिटचा स्लॅब टाकण्याचे काम मंगळवारी (दि.19) सुरू होते. ओढ्यावर 27 फुट उंचीच्या काँक्रिट भिंतीमध्ये 5 गाळे लोखंडी स्टीलच्या सहाय्याने तयार करून त्यावर दोन फूट जाडीचे काँक्रिट टाकत होते. स्लॅब बांधण्यापूर्वी ओढ्यात खोदुन त्यावर प्लायवूड टाकुन त्यावर लोखंडी खांब उभे केले होते.

परिसरात गेले दहा दिवस जोरदार पाऊस पडल्याने ओढ्यावर असलेला वेहेळदरा परिसरातील पाझर तलाव भरला आहे. सांडव्यातून जोरदार पाणी वाहत असून 27 फुट उंचीवर बांधलेल्या स्लॅबचे वजन व पाण्याच्या जोराच्या प्रवाहामुळे तळातील भराव सरकला. सायंकाळच्या सुमारास भरून झालेले दोन गाळे खचले. मोठा आवाज होऊन स्लॅब कोसळला. स्लॅब भरून झाल्याने त्यावर कोणीही नव्हते, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. स्लॅबचे लोखंडी खांब, गज पूर्णपणे वाकले. तसेच काँक्रिट पडल्याने ठेकेदाराचे मोठे नुकसान झाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news