

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्यात यंदा प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. खरीप 2022 मध्ये या योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै आहे. मात्र, या योजनेत सहभाग घेताना ई-पीक पाहणीत पिकाची नोंद असलेला दाखला असण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्टीकरण कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी दिले.
शासनाच्या ई-पीक पाहणीत पीक पेर्यांची नोंद घेण्याची कार्यवाही 1 ऑगस्ट 2022 पासून सुरू होत आहे. या योजनेत सहभाग घेण्यासाठी ई-पीक पाहणीची नोंद आवश्यक असल्याबाबत शेतकर्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शेतकर्यांनी शेतात घेतलेले पीक व विमा हप्ता भरताना नोंदविलेले पीक, यामध्ये काही तफावत आढळल्यास त्या शेतकर्याने पीक पाहणीत केलेली नोंद अंतिम गृहीत धरण्यात येईल, असा निर्णय शासनाने घेतला आहे.
ऑगस्टनंतर ई-पीक पाहणीत नोंदीचे आवाहन
या योजनेत सहभाग घेताना ई-पीक पाहणीत पिकाची नोंद असलेला दाखला असण्याची आवश्यकता नाही. शेतकरी पीक विम्याबाबत स्वयंघोषणापत्राद्वारे या योजनेत सहभाग घेऊ शकतात. मात्र, 1 ऑगस्ट 2022 नंतर त्यांनी ई-पीक पाहणीत आपल्या पिकाची नोंद करावी, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.