पुणे; पुढारी वृत्तसेवा: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यंदा श्री पंचकेदार मंदिराच्या प्रतिकृतीत विराजमान होणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ही प्रतिकृती साकारण्यात आली असून, गणेश चतुर्थीला (दि. 31) सकाळी 11 वाजून 37 मिनिटांनी स्वामी महेशगिरी महाराजांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना होणार आहे.
मंदिरावरील विद्युत रोषणाईचे उद्घाटन सायंकाळी 7 वाजता होईल, अशी माहिती ट्रस्टतर्फे महेश सूर्यवंशी आणि हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बुधवारी (दि. 31) प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी सकाळी 8.30 वाजता मुख्य मंदिरापासून गरुडरथातून गणरायाची आगमन मिरवणूक काढण्यात येईल. प्रतिष्ठापनेनंतर दुपारी 12.15 पासून भाविकांना गणरायाचे दर्शन घेता येणार आहे. गुरुवारी (दि. 1) पहाटे 6 वाजता ॠषिपंचमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे 31 हजार महिला सामुदायिकरीत्या अर्थवशीर्षपठण करणार आहेत. रात्री 10 ते पहाटे 3 वाजेपर्यंत हरी जागरच्या माध्यमातून महाराष्ट्रातील समस्त वारकरी बंधू वारकरी गजर करीत गणरायाचरणी सेवा अर्पण करतील.
याशिवाय सूर्यनमस्कार, वेदपठण, महिला हळदी-कुंकू असे विविध कार्यक्रम होतील. रोज पहाटे 5 पासून महाअभिषेक पूजा, सकाळी 8 ते दुपारी 12 आणि दुपारी 1 ते सायंकाळी 4 या वेळेत मिलिंद राहुरकर शास्त्री गणेशयाग व दुपारी 1 ते 4 या वेळेत दाक्षिणात्य पद्धतीने लक्षअर्चनासहित गणेशयाग होणार आहे. 7 सप्टेंबर रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत मंत्र जागर, तर अनंत चतुर्दशीला (दि. 9) श्री स्वानंदेश रथातून मिरवणूक निघणार आहे.
गणेशभक्तांसाठी 50 कोटींचा विमा
यंदा गणेशभक्तांसाठी तब्बल 50 कोटींचा विमा ट्रस्टतर्फे काढण्यात आला आहे. गणरायाचे ऑनलाइन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील केली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव देखाव्याच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. 150 कॅमेर्यांद्वारे या परिसरावर पोलिस यंत्रणेसोबत ट्रस्टची 200 पुरुष व महिलांची खासगी सुरक्षाव्यवस्था लक्ष ठेवणार आहे.