

पुणे : अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे मंडईतील बुरूड आळी येथे म्हसोबा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव 25 ते 29 जुलैदरम्यान होणार असल्याची माहिती ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, उपाध्यक्ष निवृत्ती जाधव आणि सारिका निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या उत्सवाच्या निमित्ताने व्यापार, उद्योग, कला, संगीत, धार्मिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. त्यात काका हलवाईचे संचालक युवराज गाडवे, बी. जे. भंडारीचे चेअरमन विजय भंडारी, अभिनेत्री निवेदिता सराफ, ज्येष्ठ संगीतकार पं. कल्याण गायकवाड, विद्यावाचस्पती स्वानंद पुंड महाराज आणि दै. 'पुढारी'चे निवासी संपादक सुनील माळी यांचा समावेश आहे.
या दरम्यान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त अक्षय गोडसे, पोलिस महेंद्र कडू यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
या पुरस्काराचे वितरण गणेश कला क्रीडा मंच येथे शुक्रवारी (29 जुलै) सकाळी साडेदहा वाजता ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, एअरमार्शल (निवृत्त) भूषण गोखले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या हस्ते होणार आहे. या उत्सवात महाआरती, रुद्राभिषेक, रुद्रयाग, भजनसेवा, ढोल-ताशा पथक वादन, गरजू विद्यार्थ्यांना वह्यावाटप, पोलिसांना बॅरिकेड्सचे वाटप, दीपोत्सव आदी कार्यक्रम होणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, 'कोहिनूर'चे कृष्णकुमार गोयल, 'सुहाना'चे संचालक विशाल चोरडिया, 'रांका'चे संचालक ओमप्रकाश रांका हे मान्यवर उपस्थित राहतील.