मोरगाव, पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्याच्या पश्चिम जिरायती भागात दोन दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस पडला होता. मात्र, आंबी खुर्दसह मोरगाव, जोगवडी, मुर्टी, तरडोली या परिसरांत पावसाने पुन्हा हुलकावणी दिली आहे. अद्यापही हा परिसर पुरेशा मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
मोरगाव परिसरात आकाश ढगाळलेले पाहावयास मिळते. शनिवारी (दि. 30) रिमझिम पाऊस फक्त 11 मिमी पडला. जोरदार पावसाअभावी परिसरातील ओढे, नाले, नदी अद्यापही कोरडे ठणठणीत आहेत. मोरगाव परिसरात पावसाने हुलकावणी दिल्याने पाण्याच्या समस्येत वाढ होऊ शकेल. पुरेसा पाऊस न झाल्यास दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकेल, अशी चिंता भेडसावत आहे.