पौड, पुढारी वृत्तसेवा : मुळशी तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून पाऊस गायब झाला आहे. रोज पडत असलेल्या उन्हामुळे भात लावणी केलेल्या शेतातील पाणी संपले असून, शेतात भेगा पडायला सुरुवात झाली आहे. परिणामी, भातपीक संकटात सापडले आहे.
जून महिना कोरडा गेल्यानंतर मुळशी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. जून महिन्यातच शेतकर्यांनी मोटारीने पाणी आणून पेरलेली भातरोपे कशीबशी वाचवली होती. जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाच्या पाण्यावर काही भागांत भातलावणी केली होती. मुळशी तालुक्यात अजूनही अनेक ठिकाणी भातलावणी होणे बाकी आहे. मात्र, आठ दिवसांपासून तालुक्यातून पाऊस गायब झालेला असून, कडाक्याचे ऊन पडत आहे.
परिणामी, ओढ्याचे पाणी कमी झालेले असून, शेतात साचलेले पाणीही आटू लागले आहे. भातलावणी केलेल्या शेतात पाणीच नसल्याने शेतात आता भेगा पडायला सुरुवात झाली आहे. अचानक पाऊस गायब झाल्याने लावणी केलेले भातपीक धोक्यात आले असून, पाण्याअभावी शेतकर्यांवर संकट ओढवल्याचे पौड येथील प्रगतशील शेतकरी अतुल भुमकर यांनी सांगितले.