पुणे : मिठाई, बनावट पनीरवर ‘एफडीए’कडून कारवाई

पुणे : मिठाई, बनावट पनीरवर ‘एफडीए’कडून कारवाई

पुणे; पुढारी वृत्तसेवा: अन्न व औषध प्रशासनाने मंचर येथील महावीर डेअरी अँड स्वीट मार्टने अस्वच्छ परिस्थितीत खवा व गुजरात बर्फी साठवल्यामुळे तसेच चाकण येथील दोन मिठाई विक्रेत्यांनी मिठाई ट्रेवर 'बेस्ट बिफोर' दिनांक नमूद केले नसल्याने कारवाई केली. मांजरी खुर्द येथील मे. आर. एस. डेअरी फार्म या विनापरवाना व्यवसाय करणार्‍या कारखान्यावर छापा मारून बनावट पनीरचा साठा जप्त केला.

एफडीएच्या वतीने महावीर डेअरी अँड स्वीट मार्ट, मंचर या स्वीट मार्टवर छापा टाकून अस्वच्छ परिस्थितीत साठविलेला खवा व स्वीट खव्याचे (गुजरात बर्फी) दोन नमुने घेऊन उर्वरित 23 हजार 800 रुपये किमतीचा 119 किलो खवा आणि 5 हजार 600 रुपये किमतीचा 28 किलो स्वीट खवा (गुजरात बर्फी) असा एकूण 29 हजार 400 किमतीचा साठा जप्त केला.

मांजरी खुर्दमधील कारखान्यावर छापा टाकून 1 लाख 97 हजार 780 रुपये किमतीचे 899 किलो बनावट पनीर, पनीर बनविण्यासाठी वापरण्यात येणारी 2 लाख 19 हजार 600 रुपये किमतीची 549 किलो स्किम्ड मिल्क पावडर आणि 4 हजार 544 रुपये किमतीचे 28.4 किलो आरबीडी पामोलीन तेल असा एकूण 4 लाख 21 हजार 924 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. पनीर हा पदार्थ नाशवंत असल्याने जप्त केलेला साठा जागेवरच नष्ट करण्यात आला असून, घेण्यात आलेले नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.

सर्व मिठाई विक्रेत्यांनी दुकानात विक्रीसाठी ठेवलेल्या मिठाईच्या ट्रेवर 'बेस्ट बिफोर' दिनांक नमूद करावा व मिठाई बनविण्यासाठी भेसळयुक्त स्वीट खवा (गुजरात बर्फी) चा वापर करू नये, दुधापासून बनविलेल्या चांगल्या दर्जाच्या खव्याचा वापर करावा. कमी दर्जाचे अन्नपदार्थ विक्री होण्याची बाब निदर्शनास आल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या 1800222365 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल.
              – संजय नारागुडे, सह आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, पुणे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news