पुणे : महाळुंगे ग्रामपंचायतीचा संशयास्पद कारभार; लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार

पुणे : महाळुंगे ग्रामपंचायतीचा संशयास्पद कारभार; लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार

महाळुंगे पडवळ; पुढारी वृत्तसेवा: येथील ग्रामपंचायतीचा अनेक विकासकामांमध्ये संशयास्पद कारभार आहे. हायमास्ट दिव्यांसाठी 10 लाख रुपये खर्च करण्यात आला असून, यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते नवनाथ जंबुकर, शरद सहकारी बँकेचे संचालक किसनराव सैद व विद्यमान उपसरपंच इसामुद्दीन शेख यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. या कामांची 30 जुलै 22 अखेर चौकशी करावी; अन्यथा बेमुदत उपोषण केले जाईल, असा इशारा दिला आहे.
महाळुंगे पडवळ येथील पाच ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंच यांनी नुकतीच कळंब येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती.

ग्रामपंचायतीमध्ये सप्टेंबर 2020 ते मे 2022 पर्यंत केलेल्या कामाची व खर्चाची वरिष्ठ पातळीवर तपासणी करण्यात यावी, ही प्रमुख मागणी या निवेदनात आहे, असे या वेळी किसनराव सैद यांनी सांगितले. ते म्हणाले, तीन सिमेंट रस्त्याची कामे मंजूर आहेत. जिल्हा परिषदेने ठेकेदार म्हणून महाळुंगे ग्रामपंचायतीला कामे करण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करून दिली. तरीही ग्रामपंचायतीने पुन्हा बी 1 निविदा का काढली. बी 1 निविदा उघडण्यापूर्वीच कामे वाटप करण्यात आल्याचे मोबाईल संभाषण ऐकवण्यात आले.

हायमास्ट दिव्यांसाठी 10 लाख रुपये खर्चातून केलेली कामे गुणात्मक दर्जाची नाहीत. कामाला मंजुरी दि. 27 सप्टेंबर रोजी अन कार्यारंभ आदेश मात्र 15 सप्टेंबर रोजी कसा देण्यात आला. दरपत्रक मंजुरीचा गुणात्मक तक्ता मार्च महिन्यातील आहे. पंचायत समितीने या कामाचे मूल्यांकन कसे केले, याबाबत चौकशी व्हावी. विकासवाडी व ठाकरवाडी अंगणवाडीची कामे अपूर्ण आहेत. निधी मात्र सहा लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. गावातील गायरान जमिनीवर घरे, गोठे, कांदा वखारी आदीचे अतिक्रमण आहे. मोजणी करून अतिक्रमणे हटविण्याबाबत ग्रामसभेत वारंवार चर्चा करण्यात आली. त्याची कार्यवाही करण्यात आली नाही.

ग्रामसभेत ग्रामस्थांनी केलेले ठराव कार्यवृतांत लिहिले जात नाहीत. 14 व 15 व्या वित्त आयोगाचा लाखो रुपयांचा निधी पडून आहे. आराखड्यातील कामाची कार्यवाही केली जात नाही. जमा-खर्च अहवालात खर्चाचे आकडे राउंड फिगरमध्ये आहेत. 30 हजार प्रवास खर्च कसा? हे ग्रामसभेत सांगत नाहीत, त्याची चौकशी होणे गरजेचे आहे, असे सैद म्हणाले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मुकुंद बारवे, कार्याध्यक्ष जिजाभाऊ आवटे, ग्रामपंचायत सदस्य विकास पडवळ, अंकुश जाधव, नीलम जाधव, विकास डोके उपस्थित होते.

तीन सदस्यांचा दूरध्वनीवरून पाठिंबा
प्रतिभा भोर, अलका पडवळ, प्रिया शिंदे हे ग्रामपंचायत सदस्य बाहेरगावी असल्याने त्यांनी दूरध्वनीद्वारे चौकशीला पाठिंबा दिला असून, उपोषणात सहभागी होणार असल्याचे सांगितले.

सदस्यांची चौकशीला तयारी
सरपंच सुजाता चासकर नॉट रिचेबल होत्या. दुसरीकडे ग्रामपंचायत सदस्य अनिल चासकर, डॉ. विठ्ठल चासकर म्हणाले की, चौकशीला आम्ही सामोरे जाऊ.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news