

पुणे; पुढारी वृत्तसेवा: महापालिकेने 448 पदांसाठी मेगा भरतीची प्रक्रिया हाती घेतली असून दिलेल्या मुदतीमध्ये आलेल्या आणि पात्र ठरलेल्या उमेदवारांची परीक्षा ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. सध्या केंद्र उपलब्ध होण्यास काही अडचणी येत असल्याने ही परीक्षा दोन किंवा तीन टप्प्यात घेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. महापालिकेत प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक व विधी सेवेमधील पदे भरण्यासाठी जाहिरात देण्यात आली होती. 2014 सालापासून महापालिकेत भरती झाली नव्हती, त्यामुळे भरती निघाल्यानंतर उमेदवारांच्या उड्या पडतील आणि लाखो अर्ज दाखल होतील.
अशी महापालिका प्रशासनाला अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात 93 हजार 991 उमेदवारांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी 87 हजार 471 उमेदवारांचे शुल्कासहित अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये सहायक विधी अधिकारी (श्रेणी 2) पदासाठी 690 अर्ज आले आहेत. लिपिक टंकलेखक (श्रेणी 3) साठी 63948 अर्ज दाखल झाले आहेत. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (श्रेणी 3) साठी 17361, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) (श्रेणी 3) साठी 2146, कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) (श्रेणी 3) साठी 25 तर सहायक अतिक्रमण निरीक्षक (श्रेणी 3) साठी 3201 असे एकूण 87 हजार 471 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत.
महापालिकेकडून या पद भरतीचे काम एका संस्थेला दिले आहे. ही भरती स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर घेतली जाणार आहे. यासाठी विविध शहरांमध्ये परीक्षा केंद्र असणार आहे. परीक्षा केंद्र उपलब्ध होण्यास काही अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे ही परीक्षा दोन- तीन टप्प्यात घेतली जाणार आहे. दरम्यान, संबंधित संस्थेने ही परीक्षा 10 सप्टेंबर रोजी घेण्याची तयारी केली होती. मात्र, गणेश विसर्जनाच्या लगेच दुसर्या दिवशी परीक्षा घेणे जिकिरीचे होणार असल्याने पालिकेने त्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता ही परीक्षा ऑक्टोबर महिन्यात होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.