

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे महापालिकेतील विविध 448 रिक्त पदांच्या भरतीसाठी शुक्रवारअखेर (दि. 5) जवळपास 42 हजार जणांची नोंदणी झाली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अखेरचे तीन दिवस शिल्लक आहेत. पुणे महापालिकेत तब्बल दहा वर्षांनंतर 448 जागांसाठी भरतीप्रक्रिया होणार आहे. त्यामध्ये सहायक विधी अधिकारी, लिपिक, टंकलेखक, कनिष्ठ अभियंता आणि अतिक्रमण निरीक्षक या पदांचा समावेश आहे. ही भरतीप्रक्रिया पारदर्शक व्हावी, यासाठी महापालिकेने केंद्र सरकारच्या इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) या संस्थेची नेमणूक केली आहे.
या भरतीप्रक्रियेसाठी 20 जुलै रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत 10 ऑगस्ट आहे. ऑनलाइन पद्धतीने हे अर्ज स्वीकारण्यात येत असून, 5 ऑगस्टपर्यंत 42 हजार जणांनी भरती प्रक्रियेच्या परीक्षेसाठी अर्ज केले आहेत, तर 35 हजार जणांनी शुल्क भरून प्रत्यक्षात नोंदणीची प्रकिया पूर्ण केली असल्याचे पुणे महापालिकेच्या सेवक वर्ग विभागाचे प्रमुख, उपायुक्त सचिन इथापे यांनी सांगितले. यामध्ये सर्वाधिक 32 हजार नोंदणी ही लिपिक पदासाठी झाली आहे. ज्या इच्छुक उमेदवारांना महापालिकेच्या या भरती प्रक्रियेत सहभागी व्हायचे आहे, त्यांनी येत्या बुधवारपर्यंत (दि.10) अर्ज दाखल करावेत, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच या भरती प्रक्रियेसाठी आर्थिक व्यवहारापासून दूर राहा, असेही आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
भरतीचे पद नोंदणी केलेले उमेदवार
लिपिक/टंकलेखक 32 हजार 706
कनिष्ठ अभियंता (सिव्हिल) 6 हजार 314
कनिष्ठ अभियंता ( मॅकेनिकल) 1 हजार 255
कनिष्ठ अभियंता ( वाहतूक) 51
सहा. अतिक्रमण निरीक्षक 1 हजार 713
सहा. विधी अधिकारी 358