पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षणाची सोडत 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे काढण्यात येणार आहे. प्रशासनाने पुण्यात ओबीसीच्या 47 जागा असल्याचे सांगितले होते, मात्र निवडणूक आयोगाच्या नव्या आदेशानुसार एक जागा कमी झाल्याने 46 जागांवर ओबीसी आरक्षण काढले जाणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी आरक्षण काढण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
आयोगाच्या आदेशानुसार पुणे महापालिकेत 173 जागांपैकी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गाचे 25 प्रभागातील आरक्षण निश्चित करून उर्वरित 148 जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाहीर करण्यात आल्या. पण सर्वोच्च न्यायालयाने बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारून पुन्हा ओबीसी आरक्षण कायम ठेवले, त्यामुळे निवडणुकांचे गणितच बदलून गेले आहे. ओबीसी समाजासाठी 27 टक्के आरक्षित जागा असतात. त्यानुसार, पुणे शहरात 47 जागा आरक्षित होणार होत्या, निवडणूक आयोगाच्या नव्या आदेशानुसार ओबीसींसाठी 46 जागा आरक्षित असतील. कमी झालेली एक जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी उपलब्ध झाली आहे, त्यामुळे सोडत काढताना ओबीसीच्या 23 जागा सर्वसाधारण गटासाठी व 23 जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत.
असे असेल प्रभागाचे आरक्षण
(कंसात महिला सदस्य)
एकूण जागा – 173 (87)
अनुसूचित जाती – 23 (12)
अनुसूचित जमाती – 2 (1)
ओबीसी – 46 (23)
सर्वसाधारण प्रवर्ग – 102 (51)