पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाची सोडत शुक्रवारी (दि. 29) निघणार आहे. यापूर्वीचे एससी व एसटी प्रवर्गाचे आरक्षण कायम ठेवून उर्वरित आरक्षण नव्याने काढण्यात येणार असल्याने पुन्हा राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण कायम ठेवण्याचा निर्णय दिला आहे.
त्यानुसार पुणे महापालिकेच्या 58 प्रभागांमधील ओबीसींच्या 46 जागांसाठी शुक्रवारी बालगंधर्व रंगमंदिरात सकाळी 11 वाजता आरक्षण सोडत निघणार आहे. ही सोडत काढताना 173 जागांमधून अनुसूचित जातीच्या 23 जागा व अनुसूचित जमातीसाठीच्या राखीव 2 जागा यांचे यापूर्वी काढण्यात आलेले आरक्षण कायम ठेवून आता उर्वरित 148 जागांमधून ओबीसी प्रवर्गाच्या 46 आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी 51 जागांवर आरक्षण सोडत काढली जाणार आहे. चिठ्ठ्यांद्वारे ही आरक्षण सोडत काढली जाणार असून, गुरूवारी निवडणूक विभागाकडून यासंबंधीची रंगीत तालीम घेण्यात आली.