पुणे : महागाईचा भडका, मिरचीचा ठसका! तब्बल 60 ते 70 टक्के दरवाढ

पुणे : महागाईचा भडका, मिरचीचा ठसका! तब्बल 60 ते 70 टक्के दरवाढ

पुणे; पुढारी वृत्तसेवा: गेल्या वर्षी मिरचीला चांगला दर मिळाल्याने मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात आले. परिणामी, मिरचीचे दर घसरले. त्यानंतर अवकाळी पावसाच्या तडाख्यात जवळपास 70 टक्क्यांपर्यंत नुकसान झाले. लाल तिखट मिरचीचा बाजारात तुटवडा झाल्याने मिरचीचे दर क्विंटलमागे 43 ते 55 हजारांपर्यंत पोहचले आहेत. विविध वस्तूंच्या वाढत्या दरापाठोपाठ महागाईच्या भडक्यात आता मिरचीच्या दरवाढीचा झटका बसला आहे. देशात आंध्र प्रदेशात लाल मिरचीचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. त्यानंतर कर्नाटक, मध्य प्रदेशचा नंबर लागतो. महाराष्ट्रात खानदेशात लाल मिरचीचे उत्पादन घेतले जाते.

तेलंगणात तिखट, तर कर्नाटकात कमी तिखट मिरची पिकवली जाते. त्याशिवाय आसाम आणि पश्चिम बंगाल, पंजाब या राज्यांमध्ये मिरचीची लागवड होते. 'गेल्या वर्षी मिरचीला चांगले दर मिळाल्याने मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात आले. परिणामी, मिरचीचे दर घसरले. त्यानंतर झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळाने आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेशातील मिरचीचे सुमारे 70 टक्के नुकसान झाले आहे. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरपासून हंगामास सुरुवात होते. तेव्हापासून दरवाढीला सुरुवात झाली. नोव्हेंबर महिन्यात कर्नाटक, मध्य प्रदेशातून तर आंध्र प्रदेश, तेलंगणमधून डिसेंबरमध्ये मिरची बाजारात येते.

अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याने मिरचीचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने सध्या मिरचीची 60 ते 70 टक्के दरवाढ झाली आहे. एकूण मिरचीचे साधारणतः 43 ते 55 हजार रुपये क्विंटलपर्यंत दर पोहचले आहेत,' अशी माहिती मिरचीचे व्यापारी राजेंद्र गुगळे यांनी दिली. तर, 'सध्या मिरचीच्या उत्पादनात मोठी गुंतवणूक करावी लागते. त्यामुळे तुलनेने उत्पादकांकडे आवश्यक साठा उपलब्ध नाही. मालाचा तुटवडा, वाढती रोगराई, मजुरांचा अभाव यामुळे येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत मिरचीचे दर तेजीत राहतील,' अशी शक्यता सोपान राख यांनी वर्तविली.

रोगराईमुळे देखील गेल्या काही वर्षांत सातत्याने लाल मिरचीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कर्नाटक, तेलंगण सरकारने आता मिरची उत्पादकांना मिरचीऐवजी कापसाचे उत्पादन घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे मिरचीचे उत्पादन आणखी घटण्याची शक्यता आहे.
                                         

                                                            – राजेंद्र गुगळे, मिरची व्यापारी

सध्या पुण्याच्या बाजारपेठेत लाल मिरचीचे दर वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांची मागणी कमी झाल्याने आवकही घटली आहे. उत्पादन क्षेत्रात निर्यातीसाठी मिरचीला मागणी अधिक आहे. दरवर्षी शीतगृहात असलेला मिरचीचा साठा यंदा कमी आहे. कर्नाटकबरोबर गुंटूर येथे पाऊस मोठ्या प्रमाणात झाला असून, तेथील पीक उशिरा येणार आहे. निर्यातीची मागणी जास्त व आवक कमी, यामुळे दर तेजीत आहेत. त्यामुळे मिरचीचे दर दुप्पट वाढले आहेत. नवीन मिरची बाजारात यायला चार महिने बाकी आहे. परिणामी, मालाचा तुटवडा होऊन आणखी दरवाढ होण्याची शक्यता आहे.
                                                               – वालचंद संचेती, ज्येष्ठ मिरची व्यापारी

दरांची स्थिती-प्रति क्विंटल
ब्याडगी मिरची (दर )
जानेवारी : 20,000 ते 23,000
ऑगस्टः 38,000 ते 43,000

डब्बी मिरची (दर )
जानेवारी : 35,000 ते 37,000
ऑगस्टः 51,000 ते 55,000

गुंटूर मिरची (दर )
जानेवारी : 15,000 ते 15,000
ऑगस्टः 25,000 ते 26,000

खुडवा मिरची (दर )
जानेवारी ; 5,000 ते 5,500
ऑगस्टः 11,000 ते 12,000

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news