पुणे : मला सदस्य केले, तुमचे आभार…! मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते सदस्य नोंदणी मोहीम

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पक्षाचा प्राथमिक सदस्य म्हणून नोंदणी करताना.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पक्षाचा प्राथमिक सदस्य म्हणून नोंदणी करताना.

पुणे; पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोठ्या जल्लोषात पुण्यात गुरुवारी पक्षाच्या सदस्य नोंदणी मोहिमेला प्रारंभ केला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रथम ऑनलाइन स्वतःचे नाव प्राथमिक सदस्य म्हणून नोंदविले. प्राथमिक सदस्य क्रमांक एक अशी मोबाईलवर केलेली नोंद त्यांनी सर्वांना दाखविली. 'मनसेने मला सदस्य करून घेतल्याबद्दल मी आभारी आहे,' अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली.

मनसेने मुंबईनंतर पुण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे मुंबईऐवजी पुण्यातून सदस्य नोंदणीला त्यांनी प्रारंभ केला. ठाकरे म्हणाले, 'निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रत्येक पक्षाने सदस्य नोंदणी करावयाची असते. त्यानुसार सदस्य नोंदणीची सुरुवात आज पुण्यात केली. नोंदणी केलेल्या सदस्यांना मोबाईलवरून संदेश पाठविले जातील. पक्षाचे कर्यक्रम तसेच अन्य गोष्टी त्याद्वारे सदस्यांना कळविल्या जातील.' पक्षाचे सरचिटणीस अनिल शिदोरे, बाबू वागसकर, गणेश सातपुते, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, वसंत मोरे, किशोर शिंदे, हेमंत संभूस, बाळा शेडगे, अनिल राणे व अनेक माजी नगरसेवक उपस्थित होते.

मनसेचे आता नवे घोषवाक्य…
'मी हिंदवीरक्षक… मी महाराष्ट्रसेवक' हे नवे घोषवाक्य मनसेने सदस्य नोंदणीच्या वेळी जाहीर केले. मोबाईलवर क्यू आर कोड स्कॅन करून सदस्य होता येणार आहे. मनसेचे स्थानिक नेते गणेशोत्सवात अनेक मंडळांजवळ फलक उभे करून सदस्य नोंदणी करण्याच्या तयारीला लागले आहेत.

जल्लोषात मोहिमेला सुरुवात…
मनसेच्या पुण्यातील मध्यवर्ती कार्यालयाला भगवे स्वरूप प्राप्त झाले होते. माजी नगरसेविका, प्रमुख महिला कार्यकर्त्या भगव्या साड्या परिधान करून आल्या होत्या. ढोल-ताशांचे पथक उत्साह वाढवीत होते. ठाकरे यांचे आगमन होताच आतषबाजी आणि भगव्या कागदी पताकांची उधळण करण्यात आली. अशा उत्साही वातावरणात मनसेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात या सदस्य नोंदणी मोहिमेला सुरुवात केली. तरुणांनी मोठ्या संख्येने सदस्य व्हावे, असे आवाहन ठाकरे यांनी केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news