टाकळी हाजी, पुढारी वृत्तसेवा : मलठण ते आमदाबाद-शिरूर रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य पसरले असून, अनेक अपघात होत आहेत. वास्तविक, सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वीच हे खड्डे बुजविणे आवश्यक होते. परंतु, हे खड्डे आता मुरूम टाकून बुजविले जात असून, रोलर न वापरल्याने मुरमातील दगड रस्त्यावर येत वाहनांचे टायर फुटून, घसरून अपघात होत आहेत.
खड्डामय रस्तादुरुस्ती अद्याप झालीच नाही, उलट मनस्ताप वाढल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत. तसेच रस्त्यात खड्डे असो किंवा खड्ड्यांचा रस्ता कामाचे बिल मात्र तातडीने काढून घेतले जाईल, अशी चर्चा करीत आहेत. तात्पुरती डागडुजी करून वाहनचालकांच्या जिवाशी खेळणार्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख गणेश जामदार यांनी केली आहे.
मलठण गावठाणातील बाजार ओट्याजवळील सिमेंट रस्त्यालगत सांडपाण्याचे मोठे गटार केले आहे. अद्याप ते बंदिस्त केले नसल्याने वारंवार अपघात होऊन नागरिक जखमी होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ गटार बंदिस्त न केल्यास रास्ता रोकोचा इशारा पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे यांनी दिला आहे.