

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करण्यासाठी समन्वयकांची नियुक्ती केली जाणार आहे. कामात कुचराई करणार्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी यशवंत माने यांनी दिली.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रशासनाने जाहीर केल्या आहेत. या मतदार याद्यांचे प्रारूप तयार करताना विधानसभा निवडणुकीसाठी मतदारसंघनिहाय उपयोगात आणलेल्या याद्यांचा आधार घेण्यात आला आहे.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी नवीन प्रभागरचना केली आहे. याद्या या संगणकावर असल्याने त्यांची प्रभागनिहाय फोड करताना अनेक तांत्रिक चुका निर्माण झाल्या आहेत. या याद्यांवर 1 जुलैपर्यंत हरकती व सूचना नोंदविता येणार आहेत. हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी शेवटचे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत.
आत्तापर्यंत 140 हून अधिक हरकती दाखल झाल्या आहेत. अंतिम मतदार याद्या 9 जुलै रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. मतदार याद्यांमधील चुका दुरुस्त करण्याचे काम महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून सुरू आहे. या सर्व त्रुटी दुर करण्यासाठी आता समन्वयकांची नियुक्ती केली जाणार आहे. जाग्यावर जाऊन हरकतींचा पंचनामा केला जाणार असल्याचे माने यांनी सांगितले.
लोकसंख्येपेक्षा जास्त मतदारसंख्या
दोन प्रभागांत लोकसंख्येच्या तुलनेत मतदारांची संख्या अधिक असल्याचे आढळून आले आहे. प्रभाग रचना करताना 2011 सालची जनगणना गृहीत धरण्यात आली आहे. गेल्या दहा वर्षांत लोकसंख्या वाढ झाली असल्याने ही तफावत आढळून येत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.