

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ढोल-डीजेचा दणदणाट, गोविंदा पथकांचा उत्साह, बघ्यांची गर्दी, आकर्षक लेझर लाइट्स, गाण्यांच्या तालावर थिरकणारी तरुणाई, बाळगोपाळांचा जल्लोष, ठिकठिकाणी सेलिब्रिटींची गर्दी… अशा उत्साहपूर्ण वातावरणात शुक्रवारी शहरासह उपनगरांत दहीहंडी साजरी झाली. कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनंतर दहीहंडी उत्सव साजरा होत असल्याने शहरातील तरुणाईची आकर्षणाची ठिकाणे असलेल्या हुतात्मा बाबू गेनू तरुण मंडळ आणि सुवर्णयुग तरुण मंडळ, अखिल मंडई मंडळ येथे दहीहंडी पाहण्यासाठी शुक्रवारी तुफान गर्दी उसळली होती.
सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी रात्री 9 वाजून 18 मिनिटांनी कसबा पेठेतील गणेश मित्रमंडळ दहीहंडी संघ या पथकाच्या गोविंदांनी सहा थर रचून फोडली. त्यानंतर हुतात्मा बाबू गेनू तरुण मंडळाची दहीहंडी कसबा पेठेतील शिवतेज गोविंदा पथकाने पाचव्या प्रयत्नात सात थर रचून रात्री दहाच्या सुमारास फोडली आणि सर्वत्र एकच जल्लोष झाला. मध्य वस्तीतील पेठांमधील छोट्या मंडळांनी सायंकाळी आठनंतरच शहरातील बहुतेक दहीहंडी फोडायला सुरुवात केली. शुक्रवारी अनेक मंडळांनी या उत्सवादरम्यान डीजेसह ढोलताशा पथकांचे वादनही ठेवले होते. वादनातील विविध ताल आणि ठेक्यांवर मोठ्या प्रमाणात तरुणाई जल्लोषात नाचत होती.
यंदा सिनेस्टारसह रिल्सस्टारही जोरात
उपनगरांमध्ये नागरिकांना आकर्षित करण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवादरम्यान चित्रपट, दूरचित्रवाणी मालिकांमधील सेलिबि—टींना आमंत्रित करण्यात आले होते; तसेच यंदा प्रथमच इन्स्टाग्रामवरील रिल्सस्टारदेखील पुण्यातील अनेक मंडळांच्या दहीहंडीचे आकर्षण होते. त्यांना पाहण्यासाठी तरुणाईने प्रचंड गर्दी केली होती. या वेळी आपल्याच दहीहंडीसाठी गर्दी व्हावी, यासाठी आकर्षक विद्युतरोषणाई, देखावे करण्यात आले होते.
उपनगरेही जोरात
कोथरूड, वारजे, सिंहगड रस्ता, धायरी, हडपसर, कात्रज, बाणेर, औंध, शिवाजीनगर, चंदननगर, वडगाव शेरी, हिंजेवाडी या उपनगरांमधील मंडळांनी मोठ्या प्रमाणात डीजे लावले होते. दहीहंडी फोडण्यासाठी मुंबईसह अन्य ठिकाणांहून गोविंदा पथके दाखल झाल्याचे पाहायला मिळाले.
वाहतूक कोंडीने बोजवारा..!
शहर आणि उपनगरांतील मुख्य चौकांमध्ये आणि रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात दहीहंडी बांधून उत्सव साजरा करण्यात आला. त्यामुळे सायंकाळनंतर शहराच्या बहुतांश भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. दहीहंडी पाहायला आलेल्या नागरिकांनी रस्त्याच्या बाजूलाच आपली वाहने लावल्याने या वाहतूक कोंडीमध्ये भरच पडत गेली. त्यामुळे वाहतूक पोलिसांतर्फे सायंकाळनंतर मध्यवस्तीत जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
उत्सवादरम्यान दहीहंडी पाहण्यास येणार्या गोविंदाभक्तांना, दहीहंडी फोडणार्या गोविंदांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, तसेच वाहतूक सुरळीत राहावी, अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पुणे पोलिसांतर्फे जागोजागी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांना मदत करण्यासाठी मंडळांच्या स्वयंसेवकांची फौजही मोठ्या प्रमाणात कार्यरत होती.