पुणे : भोर तालुक्यात 5 घरांची पडझड

अतिवृष्टीत कोसळलेल्या घरांच्या भिंतीचे पंचनामे करताना अधिकारी.
अतिवृष्टीत कोसळलेल्या घरांच्या भिंतीचे पंचनामे करताना अधिकारी.

भोर, पुढारी वृत्तसेवा : भोर तालुक्यातील पाच गावांत अतिवृष्टीत घरांची पडझड झाली. पडझडीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने ताबडतोब पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

तालुक्यात सर्वत्र गेले 8 दिवस सलग जोरदार पाऊस पडत आहे. पावसामुळे भात शेतीला फायदा होणार असला, तरी कडधान्य पिके पाण्याखाली गेली आहेत. घरांच्या भिंती कोसळून अतोनात नुकसान झाले आहे. तालुक्यातील अंकुश मारुती शिंदे ( बाजारवाडी) , गणेश प्रभाकर गायकवाड (खानापूर ), अर्जुन भगवान कांबळे ( अंगसुळे), वरवे, रमेश लक्ष्मण गोहिणे (गृहिणी), नथू किसन वरे (नेरे) यांच्या राहत्या घराच्या भिंती कोसळून लाखोंचे नुकसान झाले आहे. घर पडझडीच्या नुकसानीची प्रशासनाने दखल घेऊन त्वरित पंचनामे करावेत, तसेच लवकरात लवकर नुकसानग्रस्तांना भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

नशीब बलवत्तर म्हणून बचावलो

जोरदार पाऊस सुरू असतानाच लघुशंकेसाठी घरातून बाहेर जात होतो, तोच एक मिनिटात पाठीमागे घराच्या चौकटीची महत्त्वाची भिंत कोसळली. एक मिनिट घराबाहेर पडण्यास उशीर झाला असता, तर या भिंतीच्या ढिगार्‍याखाली सापडलो असतो, असे खानापूर येथील गणेश प्रभाकर गायकवाड यांनी सांगितले.

तलाठी, ग्रामसेवकाशी संपर्क साधा

सध्या तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. तालुका दुर्गम डोंगरी असल्याने पावसात भात शेती, घरांची पडझड होऊ शकते. तालुक्यातील कोणत्याही नागरिकाची शेती, घराची पडझड झाल्यास संबंधित तलाठी व ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार सचिन पाटील यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news