पुणे : भुयारी मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

शिर्सुफळ येथील रेल्वे भुयारी मार्गाची झालेली दुरवस्था दाखवताना गावकरी.
शिर्सुफळ येथील रेल्वे भुयारी मार्गाची झालेली दुरवस्था दाखवताना गावकरी.
Published on
Updated on

उंडवडी, पुढारी वृत्तसेवा : बारामती – पुणे रेल्वे मार्गावरील शिर्सुफळ (ता. बारामती) स्थानकालगत असलेल्या भुयारी मार्गाच्या दुरुस्तीकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. मार्गामध्ये मोठे खड्डे पडले असून याबाबत अनेक वेळा तक्रारी केल्या तरीही दाद घेत नसल्याचे चित्र आहे. मोठा अपघात होऊन जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार का असा प्रश्न विचारला जात आहे.

शिर्सुफळ येथील रेल्वे स्टेशनलगत भिगवण- सुपे मार्गावरील रेल्वे गेट सर्वांत जास्त वाहतूक असताना तसेच ग्रामस्थांचा मोठा विरोध होऊनही बंद केले. त्यांना पर्यायी मार्ग म्हणून पाचशे मीटर अंतरापासून भुयारी मार्ग करून दिला. या वेळी रेल्वे लाईनच्या कडेने भुयारी मार्गापर्यंत रस्ता डांबरी केले. मार्गाची खूप दुरवस्था झाली असून मोठ- मोठे खड्डे पडले आहेत. परिणामी मोठ्या अपघाताची शक्यता आहे.

मार्गावरून सिध्देश्वर निंबोडी, पारवडी, शिर्सुफळ, मळद, साबळेवाडी, कौठडी, भोळोबावाडी, उंडवडी या भागातील शेतकरी, विद्यार्थी, दूध उत्पादक तसेच ग्रामस्थांची वर्दळ असते. मात्र या मार्गाच्या देखभाल व दुरुस्तीकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. याबाबत तत्काळ खड्डे भरण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब आटोळे, सतीश मेरगळ, विजय आटोळे आदींनी केली आहे

दवाखान्यात जाणार्‍या रुग्णांचेही हाल

शिर्सुफळसाठीचे प्राथमिक आरोग्य केंद्र, हायस्कूल, तलाठी कार्यालय ही महत्त्वाची कार्यालये रेल्वे पुलाच्या दुसऱ्या बाजूला आहेत. यामुळे दवाखान्यात जाणारे रुग्ण, रुग्णवाहिका तसेच हायस्कूलमधील विद्यार्थी, तलाठी कार्यालयात जाणारे ग्रामस्थ यांनाही रस्ता दुरवस्थेचा सामना करावा लागत आहे. भुयारी मार्गावर काटेरी झुडपांचे जाळे मोठ्या प्रमाणात असून लवकरात लवकर संबंधित विभागाने दखल घेऊन दुरुस्ती करावी, अशी मागणी गाडिखेलचे सरपंच बाळासाहेब आटोळे यांनी केली आहे.

शिर्सुफळ येतील भुयारी मार्गातून वाहने आणि नागरिकांची वर्दळ असते. वाहनांना खड्ड्यांचे अंदाज न आल्याने सतत किरकोळ अपघात होत आहेत. सध्या पावसामुळे तर या रस्त्याची अवस्था अधिकच दयनीय झाली आहे. सदर बाबही रेल्वेच्या अखत्यारीत आहे. प्रशासन मोठ्या अपघातात बळी जाण्याची वाट पाहत आहे का?

                                                – दादासाहेब आटोळे, सदस्य, ग्रामपंचायत शिर्सुफळ.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news