

बेल्हे, पुढारी वृत्तसेवा : जुन्नर, आंबेगाव, खेड या तालुक्यांत ऊसपिकात बिबट्या आढळण्याच्या घटना वारंवार घडतात. अशातच सोमवारी जुन्नर तालुक्यातील राजुरी गावाजवळ असणार्या तागडामळा शिवारात ऊसतोडणी सुरू असताना बिबट्याचे दोन बछडे आढळून आले होते. मंगळवारी या बछड्यांचे आणि त्यांच्या आईची गाठ घालून देण्यात वन विभागाला यश आले आहे.
ओतूर वन विभागाने राजुरी शिवारात या बछड्यांचा बचाव करीत त्यांच्या आईच्या कुशीत सोडून दिले. राजुरी येथील शेतकरी असिफ अब्दुल्ला महालदार यांच्या शेतात ऊसतोडणीदरम्यान बिबट्याचे बछडे आढळले. नर मादी जातीचे अंदाजे 2 महिने वयाचे हे बछडे होते. याबाबत ओतूर वन विभागाने सोमवारी सायंकाळी बचाव दलाच्या माध्यमातून कॅमेरा लावून बछडे मादीच्या भेटीसाठी ठेवले. रात्री उशिरा मादी तेथे फिरून गेली. मात्र, बछडे नेले नाहीत. त्यानंतर मादी पुन्हा आली आणि बछड्यांना आपल्यासोबत घेऊन गेली. बछडे आणि त्यांच्या आईचे यशस्वीरीत्या पुन्हा मिलन झाल्याचे वनपाल साळुंखे यांनी सांगितले.
दरम्यान, राजुरी परिसरात बिबट्याच्या मादीसह बछड्यांचा मुक्त संचार असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहनही साळुंखे यांनी केले आहे.